परभणी - 'ना खान चाहिये ना बाण चाहिये, हमे अपना जीवन छान चाहिये' असे मत गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी यांनी व्यक्त केले. मंगळवारी परभणीत राष्ट्रीय दलित अधिकार मंचच्या संविधान सन्मान यात्रेनिमित्त जिग्नेश मेवाणी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परभणीच्या परिस्थितीबाबत आपले मत मांडले.
यावेळी बोलताना आमदार मेवाणी म्हणाले, आम्हाला खान-बाणचे राजकारण करायचे नाही. आम्हाला लोकांना तोडण्याचे नाही तर जोडण्याचे राजकारणाची विचारधारा हवी आहे. प्रत्येकाने माणसात माणूस पहावा. तो दलित आहे, हिंदू आहे, मुस्लिम आहे, हे पाहू नये, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांनी केंद्र शासनावरही कडाडून टीका केली. अच्छे दिनचे वचन देऊन भाजप सरकार केंद्रात विराजमान झाले. पण चांगल्या दिवसाच्या नावावर आजपर्यंत भाजपने ठेंगा दिला आहे. महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नागपूर अशा मोठ्या शहरांमध्ये विकासाची खूप मोठी संधी होती. परंतु, मोदी सरकार महाराष्ट्रात विकास करण्यात पूर्णतः अयशस्वी ठरली आहे. या सरकारने दोन कोटी रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात मात्र, दोन कोटी रोजगार देण्याचे का? रोजगार काढून घेण्याचे आश्वासन दिले? हे त्यांनाच माहीत असेही ते म्हणाले.
"गुजरात मॉडेल एक मृगजळ"
स्वतंत्र भारतात इतक्या वर्षानंतर आणि तेही 56 इंच छाती असलेले पंतप्रधान असताना देशात साधे पिण्याचे पाणी मिळू नये. ही अत्यंत चिंतेची बाब आहे. गुजरात मॉडेल दाखवून या भाजप सरकारने देशातील अनेक राज्यात सत्ता संपादन केली. प्रत्यक्षात मात्र गुजरात मॉडेल म्हणजे एक मृगजळ आहे. आता याला महाराष्ट्रातील जनतेने भुलू नये. हेच सांगण्यासाठी मी येथे आलो असल्याचेही आमदार मेवाणी म्हणाले. परभणी शहरातील बी. रघुनाथ सभागृहात जिग्नेश मेवाणी यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी राष्ट्रीय दलित विचार मंचचे रवी सोनकांबळे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.