परभणी - दुष्काळामुळे निर्माण झालेल्या पाणीबाणीतून मुक्ती मिळविण्यासाठी गंगाखेड तालुक्यातील ईसादचे आबाल-वृद्ध सरसावले आहेत. पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून सुरू असलेल्या वॉटर कप स्पर्धेत गावाने सहभाग नोंदवला आहे. मागील १० दिवसांपासून गावातील सर्वच मंडळी आपसातील मतभेद विसरून विविध कामे पूर्ण करण्यासाठी झटत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे.
सध्या संपूर्ण गंगाखेड तालुक्यात श्रमदानाचे तुफान आल्याचे चित्र आहे. सिनेअभिनेते अमिर खान यांच्या संकल्पनेतून आकारास आलेल्या पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून गावागावात विविध कामे पूर्ण केली जात आहेत. गंगाखेडपासून जवळच असलेल्या ईसाद येथेही गेल्या १० दिवसांपासून सकाळ-संध्याकाळ श्रमदान केले जात आहे. सर्वच राजकीय पक्षांसह सामाजिक कार्यकर्ते, शासकीय कर्मचारी, व्यापारी या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवत आहेत. श्रमदानातून अद्याप बांध-बंदिस्ती, सीसीटीची कामे करण्यात आली आहेत. तर आगामी काळात ईसाद डॅमसह इतर नद्या-नाल्यांचे रूंदीकरण आणि गाळ उपसण्याचे काम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती सरपंच सिद्धार्थ भालेराव यांनी दिली.
इसाद येथील आजच्या श्रमदान उपक्रमात काँग्रेस तालुकाध्यक्ष तथा साईसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष गोविंद यादव यांनी सहभाग घेतला. ही कामे पूर्ण करण्यासाठी ज्यांना जी मदत शक्य आहे, ती मदत प्रत्येकाने करावी, असे आवाहन यादव यांनी केले. गावचे सुपुत्र प्राचार्य डॉ. वसंत सातपुते यांनीही सकाळी ६ ते ८ श्रमदान केले. जे काम मशीनने करणे योग्य आहे त्या कामासाठी डिझेलकरिता रुपये ५ हजार रुपये देणगी दिली. तसेच मासोळी नदीच्या रुंदीकरणासाठी जेव्हा गरज पडेल, तेव्हा २५ हजार रुपये देणगी देण्याचे प्राचार्य सातपुते यांनी जाहीर केले.
माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीकांत भोसले, मेजर विश्वनाथ सातपुते, सरपंच सिध्दोधन भालेराव, भाऊसाहेब भोसले, नितिन भोसले, रमेश औसेकर, उत्तम भोसले, बाळु भोसले, प्रदिप भोसले, प्रभाकर सातपुते, आर. डी. भोसले, बालाजी सातपुते, योगेश भोसले, डिगंबर वाघमारे, पाणी फाऊंडेशनचे बालासाहेब गुलभिले, पवार आदिंसह महिला, पुरुष व विद्यार्थ्यांची यावेळी उपस्थिती होती.