परभणी - दोन महिन्यांपर्यंत ग्रीन झोनमध्ये राहणाऱ्या परभणी जिल्ह्यात गेल्या सहा दिवसात दररोज कोरोनाबाधित रुग्ण आढळण्याची मालिकाच सुरू झाली आहे. जिल्ह्यात रेडझोन मधून येणाऱ्या लोकांमुळे कोरोना विषाणूचा चांगलाच फैलाव सुरू झाला आहे. बुधवारी एकाच दिवशी नऊ जण पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर गुरुवारी रात्री 10 वाजता प्राप्त झालेल्या अहवालात पुन्हा चार जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. ज्यामुळे परभणीमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
यापूर्वी परभणी शहरातील मिलिंद नगर भागात मुंबईहून आलेल्या एका महिलेचा अहवाल रविवारी (१७ मे) पॉझिटिव्ह आला होता. तिच्या संपर्कात आलेल्या परिसरातील ४ जणांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले होते. आज गुरुवारी रात्री उशिरा आलेल्या अहवालात त्यातील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्याशिवाय शहरातील मातोश्री नगरातील आणि परभणी तालुक्यातील आसोला येथील प्रत्येकी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या प्रमाणेच सोनपेठ तालुक्यातील शेळगाव येथे ज्या सहा जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले होते, त्यांच्याच निकटवर्तीयांपैकी आणखी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्यात सहा दिवसांत लागोपाठ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने जिल्हा हादरला आहे.
मातोश्री नगर आणि असोला ग्रामपंचायत प्रतिबंधित क्षेत्र -
दरम्यान, गुरुवारी रात्री नव्याने आढळलेल्या कोरोनाबाधित रुग्णांमुळे मातोश्री नगर आणि असोला ग्रामपंचायत परिसरातील सय्यदमियाँ पिंपळगाव हा संपूर्ण परिसर रात्री 10 वाजल्यापासून प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी जाहीर केला आहे. याशिवाय शेळगाव आणि मिलिंदनगरचा परिसर यापूर्वीच प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आलेला आहे. हा संपूर्ण भाग सील करण्यात येत असून त्या भागात निर्जंतुकीकरण करण्याचे काम सुरू करण्याचे आदेश देखील जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी दिले आहेत.
पूर्णा येथील रुग्णाच्या संपर्कातील 45 जण ताब्यात -
पूर्णा तालुक्यातील माटेगाव येथील कोरोना बाधीत रुग्णाच्या संपर्कात आलेले ४५ जण ताब्यात घेण्यात आले आहेत. पांगरा रोडवरील शासकीय क्वॉरंटाईन कक्ष सील करण्यात आला आहे. तर पूर्णा शहरासह नगरपालिकेच्या तीन किमीच्या हद्दीमध्ये संचारबंदी लागु केली आहे.
११७ संशयितांचे स्वॅब पाठवले -
जिल्ह्यात दररोज संशयित रुग्णांचा आकडा वाढत आहे. त्यानुसार आज तब्बल ११७ जणांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. आतापर्यंत २० जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यापैकी एक जण कोरोनामुक्त झाला आहे. तर आजपर्यंत १ हजार ७०२ जणांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यापैकी १ हजार ४३४ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
'त्या' तिघांसह २१९ अहवाल प्रलंबित"
दरम्यान, एका विशेष श्रमिक रेल्वेने दिल्लीवरुन पुर्णेत परतलेल्या चुडावा, खुजडा, पूर्णा येथील तीन रुग्णांचे स्वॅब घेऊन काल बुधवारी नांदेड येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. मात्र त्यांचा अहवाल अजूनही प्रलंबित आहे. या तिघांसह परभणी जिल्ह्यातील एकूण २१९ जणांचे अहवाल प्रलंबित असल्याने धाकधूक वाढली आहे.
'त्या' मृत मुलाचा अहवाल निगेटिव्ह-
जिंतूर तालुक्यातील सोस जोगवाडा येथील क्वॉरंटाईन केलेल्या बालकाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली होती; मात्र त्या चिमुकल्याचा अहवाल आज प्राप्त झाला असून तो निगेटिव्ह आहे. शिवाय त्याच्या आई-वडिलांचे नमुने देखील तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्या तिघांचाही अहवाल निगेटिव्ह असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.