परभणी - राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या निवासी शाळेतील 35 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना घडली. यातील 26 विद्यार्थ्यांना नांदेडच्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे. उपचारानंतर सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे. पूर्णा येथील सामाजिक न्याय भवन येथे चालणाऱ्या शाळेत हा प्रकार घडला.
पांगरा रस्त्यावर राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या इमारतीमध्ये निवासी शाळा चालवली जाते. या ठिकाणी 175 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यापैकी तेथे उपस्थित असलेल्या 134 विद्यार्थ्यांनी शुक्रवारी एकत्र जेवण घेतले. यातील 35 विद्यार्थ्यांना उलटी, मळमळ, डोके दुखीचा त्रास होऊ लागला. त्यामुळे या विद्यार्थ्यांना तातडीने पूर्णेच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. 26 विद्यार्थ्यांना पुढील उपचारासाठी नांदेडला हलवले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून धोका टळल्याचे शाळा प्रशासनाने सांगितले.
हेही वाचा - तब्बल 82 वर्षांपासून सुरू आहे अखंड वीणा वादन, अख्खे गाव जोपासतंय वीणेची परंपरा
या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सुभाष राठोड यांनी प्रकरणाची नोंद केली. या निवासी शाळेच्या विद्यार्थ्यांना पुसद येथील गजानन ट्रेडर्स या कंपनीकडून भोजन व्यवस्था केली जाते. निकृष्ट भोजन दिले जात असल्याची तोंडी तक्रार यापूर्वी देखील झाली होती. मात्र, याबाबत लेखी स्वरुपात तक्रार देण्यासाठी कुणीही तयार नाही. समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त सचिन कवले यांनी पथकासह शाळेला भेट देवून पाहणी केली.