परभणी - कोणत्याही परिस्थितीची जाणीव न ठेवता काही अधिकारी जनतेला सतत लुटताना दिसतात. गंगाखेड येथे एका भू-मापकाने अशाच रितीने एका नागरिकाला प्रमाणपत्रासाठी लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भू-मापक गजानन वानखेडे असे या भ्रष्ट अधिकाऱ्याचे नाव असून पीआर-कार्डचे (प्रमाणपत्र) देण्यासाठी त्याने दहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याला लाच घेताना रंगेहाथ अटक केली आहे.
हेही वाचा... देशातील कोणीही उपाशी राहणार नाही, मदतीसाठी १.७ लाख कोटींचे पॅकेज; अर्थमंत्र्यांची माहिती..
गंगाखेड येथे एका नागरिकाने आपल्या जमीनीच्या पीआर-कार्ड (प्रमाणपत्र) ची मागणी भूमिअभिलेख कार्यालयाकडे केली होती. त्या ठिकाणीच्या भूमापक गजानन किशनराव वानखेडे याने हे प्रमाणपत्र देण्यासाठी दहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. त्यामुळे संबंधित तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याची तक्रार नोंदवली.
दिनांक 28 फेब्रुवारी रोजी लाचलुचपत अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची पडताळणी केली होती. त्यानंतर आज (26 मार्च) परभणीच्या सरकारी दवाखान्यात भूमापक गजानन वानखेडे याने तक्रारदारकाकडून दहा हजार रुपयांची लाच स्विकारली. यावेळी अगोदरच सापळा रचलेल्या अधिकाऱ्यांनी गजानन वानखेडे याला रंगेहात पकडले.
वानखेडे याच्यावर नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई नांदेड परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर, अपर अधीक्षक अर्चना पाटील, परभणीचे पोलीस उपाधीक्षक भरत हुंबे, पोलीस निरीक्षक भुजंग गोडबोले यांसह इतर अधिकारी यांच्या पथकाने केली.