परभणी - महाराष्ट्रात धनगड नावाची जात अस्तित्वात नाही; ती धनगर आहे. असे वक्तव्य धनगर समाज आरक्षणाचे याचिकाकर्ते आणि माजी पोलीस महानिरीक्षक मधू शिंदे यांनी केले आहे. धनगर हे नाव असल्याबाबतचे असंख्य पुरावे उच्च न्यायालयात सादर करण्यात आले असून, येत्या 4 सप्टेंबरला अंतिम सुनावणी होईल व आम्हाला न्याय मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
धनगर समाज अनुसूचीत जातींच्या प्रवर्गात आरक्षण मिळवण्यासाठी अनेक वर्षांपासून लढा देत आहे. परंतू, शासनाच्या आरक्षण यादीत धनगड हा शब्द असल्याने महाराष्ट्रातील लाखो धनगर समाज अरक्षणापासून वंचित आहे. यासंदर्भात न्यायालयीन लढाई लढणारे माजी पोलीस महानिरीक्षक मधू शिंदे, अॅड. मु.अ. पाचपोळ, तुळशीराम आचणे यांनी परभणीत माध्यमांसमोर त्यांची बाजू मांडली. अहिल्यादेवी प्रबोधन मंच, मुंबई यांनी न्यायालयात सर्व पुरावे देऊन राज्यातील धनगर जमात ही घटनेनुसार अनुसूचित जमातीत येत असून, ती आद्य आदिवासी जमात असल्याचे सिध्द केले आहे, असे मधू शिंदे म्हणाले. तसेच धनगर समाज सर्व अटींची पूर्तता करत असून, मागील 60 वर्षांपासून अनुसूचित जमातीच्या सवलतींपासून वंचित असल्याचे त्यांनी सांगितले.
धनगर समाजाला शासनाने दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी करण्यासाठी 9 ऑगस्टपासून पंढरपूरला आंदोलन सुरू झाल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच अनुसूचित जमाती कायदा लागू करून वन विभागाने मेंढपाळांवर दाखल केलेले सर्व अन्यायकारक खटले बिनशर्त मागे घेण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी केली.
धनगर समाजाने 2014 मध्ये भाजपा-सेनेला सत्तेवर बसवूनही आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागला नाही. धनगर जमातीची कायदेशीर बाजू न्यायालयात मांडूनही शासनाने वेळोवेळी हा प्रश्न प्रलंबित ठेवला. म्हणून महाराष्ट्र राज्यातील धनगर समाजावर अन्यायाची भावना निर्माण झाल्याचे ते म्हणाले.
नुकत्याच मराठा समाजाला मिळालेल्या आरक्षणामुळे धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.