परभणी- आपला कृषिप्रधान देश आहे. कृषी शिक्षणाच्या पदव्या व्यावसायिक केल्या जात असतील तर हा गंभीर प्रश्न आहे. त्यामुळे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मागण्या योग्य आहेत. हा प्रश्न मी स्वतः सभागृहात मांडणार, अशी ग्वाही राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
हेही वाचा- 'सुटाबुटातल्या सरकारमुळे देशाची अवस्था अतिदक्षता विभागातल्या रुग्णासारखी'
येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात गेल्या तीन दिवसांपासून कृषी पदवीला व्यावसायिक दर्जा द्यावा, अभ्यासक्रमासाठी आकारण्यात येणारे भरमसाट शैक्षणिक शुल्क कमी करावे आणि बंद करण्यात आलेली शिष्यवृती पुन्हा चालू करावी, या प्रमुख मागण्यांसह विद्यार्थ्यांनी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. तीन दिवस झाले तरी या आंदोलनार्थी विद्यार्थ्यांकडे शासन लक्ष देत नाही. त्यातच विद्यापीठ या विद्यार्थ्यांवर दबाव आणत आहे.
दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे परभणीत आले असता, त्यांचा ताफा वसमत रोडवर अडवून विद्यार्थ्यांनी मागण्यांचे निवेदन त्यांना दिले. देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी आपण स्वतः लक्ष घालून विद्यार्थ्यांचे मुद्दे सभागृहात मांडणार असल्याची ग्वाही दिली. या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्काविषयीचे प्रश्नही गंभीर आहेत. या विद्यार्थ्यांच्या सर्वच मागण्या योग्य आहेत. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी विरोधी पक्षनेता म्हणून जे-जे शक्य असेल ते मी करणार, असे यावेळी देवेंद्र फडणीस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.