परभणी - शरद पवारांना देण्यासाठी आणलेली तलवार सुरक्षेच्या कारणावरुन अडवल्याने धनंजय मुंडे आणि पोलीस उपअधीक्षकांमध्ये वाद झाला. यानंतर धनंजय मुंडे यांनी ही तलवार स्वत: व्यासपीठावर नेल्याचा प्रकार आज शरद पवारांच्या सभेदरम्यान घडला.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांची सभा शहरात आयोजीत करण्यात आली होती. या सभेला जिल्हाभरातील कार्यकर्त्यांनी मोठी हजेरी लावली. मात्र, व्यासपीठाच्या जवळ बसण्याच्या कारणावरुन कार्यकर्ते आणि पोलीस अधिकाऱ्यांमध्ये वाद झाला. यावेळी विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी कार्यकर्त्यांची बाजू घेऊन पोलीस अधिकाऱ्यांशी वाद घातला. दरम्यान, पोलीस अधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांना बसण्याची परवानगी दिल्याने हा वाद निवळला. मात्र, कार्यक्रमादरम्यान शरद पवारांना भेट देण्यासाठी कार्यकर्त्यांनी तलावर आणली होती. ही तलावर सुरक्षेच्या कारणावरुन व्यासपीठावर नेण्यासपोलीस उपअधीक्षक बगाटे यांनी मज्जाव केला. हे पाहताच धनंजय मुंडे पोलीस अधिकाऱ्यांवर धावून गेले आणि स्वत: तलावर हातात घेऊन व्यासपीठावर नेली. या प्रकारामुळे सभास्थळी काही काळ तणाव निर्माण झाला होता. दरम्यान, हा सर्व प्रकार शरद पवारांच्या समोरच घडला हे विशेष.
हेही वाचा - काँग्रेसचा मास्टरप्लान ! त्यामुळे पक्ष राज्यात पुन्हा मारणार मुसंडी?