परभणी - विविध मागण्यांसाठी परभणीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातील कंत्राटी परिचारिका आणि परिचारकांनी आज (सोमवार) एक दिवसीय धरणे आंदोलन केले. आपल्या मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्यात, अन्यथा हे आंदोलन तीव्र स्वरूपात करण्याचा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला आहे.
सध्या सर्वत्र कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. या संसर्गाच्या परिस्थितीत आरोग्य विभागात काम करणारे डॉक्टर्स, परिचारिका आपला जीव धोक्यात घालून काम करत आहेत. मात्र, शासन त्यांच्यावरच वेतन कपात किंवा अन्य काही निर्बंध लादून अन्याय करत असल्याची भावना सध्या निर्माण झाली आहे. त्यातल्या त्यात कंत्राटी तत्त्वावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नोकरीत स्थिरता दिसून येत नसल्याने त्यांच्यामध्ये घबराट निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत कंत्राटी कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची टांगती तलवार असल्याने त्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.
याअंतर्गत आज परभणीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयांमध्ये कार्यरत असलेल्या परिचारिका आणि परिचारक यांना 2015 नंतर काढण्यात आलेल्या आदेशानुसार कायमस्वरूपी करण्यात यावे. तसेच एप्रिल 2020 मध्ये करण्यात आलेली पगार कपात रद्द करून सातव्या वेतन आयोगानुसार पगार देण्यात यावी, 6 महिन्याचा करार रद्द करून तो 11 महिन्यांचा करावा, यासह अन्य काही मागण्यासाठी धरणे आंदोलन केले. हातात विविध मागण्यांचे फलक घेवून या कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी केली. आक्रमक झालेल्या या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या प्रश्नांकडे प्रशासनाने लक्ष न दिल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.