परभणी - परभणी-लातूर अंतर तब्बल ४५ किलोमीटरने कमी करणाऱ्या गोदावरी नदीवरील पुलाच्या पायाभरणीचे काम पूर्ण झाले आहे. हा पूल पूर्ण झाल्यास विदर्भ ते कर्नाटक हा राष्ट्रीय महामार्ग अस्तित्वात येऊ शकेल. त्यामुळे कर्नाटकदेखील जवळ येणार आहे.
हा पूल पूर्णा तालुक्यातील वझूरच्या गोदापात्रावर उभारण्यात येत आहे. या कामाचे भूमिपूजन गतवर्षी बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले होते. महामार्गावर वाहतूक सुरू झाल्यास परभणीतून लातूर केवळ अडीच तासांत गाठता येणार आहे. यामुळे पैसे आणि इंधन या दोहोंचीही मोठी बचत होणार आहे. हा प्रस्तावित महामार्ग २२२ राष्ट्रीय महामार्गावरील त्रिधारा येथून सुरू होतो. पुढे पिंगळी, वजूर, रावराजूर, मरडसगाव, बनवस, मालेगाव, अहमदपूरमार्गे लातूरला जोडला जातो.
१९५४ साली नागपूर करारात विदर्भ ते कर्नाटक प्रांताला जोडणारा हा रस्ता प्रस्तावित करण्यात आला होता. परंतु कालांतराने हा महामार्ग होऊ शकला नाही. मात्र, आता या महामार्गाची आवश्यकता भासू लागली आहे. त्यानुसार या महामार्गावर सर्वात मोठी अडचण होती ती गोदावरी नदीचे पात्र कसे ओलांडावे? त्यामुळे या भागातील प्रतिष्ठित नागरिक अॅड. दादा पवार यांनी वझुर ते राजुर या गावादरम्यान असलेल्या गोदावरीच्या पात्रावर पूल उभारण्याचा प्रस्ताव शासनाकडे दिला होता. शासनानेदेखील या पुलाला मंजुरी देऊन सदर महामार्गाच्या निर्मितीचा मार्ग प्रशस्त केला.
सध्या त्रिधारा ते लातूर हे अंतर १६५ किलोमीटर एवढे आहे. शिवाय या मार्गावर परभणी, गंगाखेड, परळी, आंबेजोगाई ही महत्त्वाची शहरे असून ती ओलांडावी लागतात. ज्यामुळे इंधन, वेळ आणि पैसा तिन्ही खर्च होतो. मात्र, त्रिधारा ते अहमदपूर आणि पुढे लातूर हा महामार्ग ४५ किलोमीटरचे अंतर कमी करणार आहे. शिवाय यावर अहमदपूर वगळता एकही मोठे शहर नसल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न राहणार नाही. त्यामुळे विदर्भातून येणारी वाहने लातूर किंवा पुढे कर्नाटकात कमी वेळेत आणि कमी इंधनात पोहोचू शकतील.
विशेष म्हणजे या महामार्गावर येणारे गावे आत्महत्याग्रस्त आहेत. हा महामार्ग झाल्यास त्यावर दळणवळण वाढून या परिसरात उद्योग धंदे उभारण्यासाठी मदत होणार आहे. त्यामुळे या ठिकाणच्या लोकांना रोजगार उपलब्ध होऊन सुबत्ता येईल. तसेच या महामार्गावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेली गावे आहेत. ज्यामध्ये रोकडेवाडी, मसनेरवाडी व कापसी ही गावे येणार असून त्या गावांचाही विकास होईल, अशी माहिती अॅड. दादा पवार यांनी दिली.
या पुलाचे काम मार्च महिन्यात सुरू झाले असून पात्रातील पायाभरणी पूर्ण झाली आहे. मोठ्या पावसापूर्वी पुलाचे काम मोठ्या प्रमाणात होईल, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यावेळी गंगाखेड बांधकाम विभागाचे उपअभियंता सोनवणे, संबंधित ठेकेदार औटी, काष्टे यांनी मंगळवारी कामाची पाहणी करून आढावा घेतला.