परभणी - पावसामुळे चिखलमय झालेल्या रस्त्यावरून एक बस घसरून रस्त्याच्या बाजूला खड्ड्यात पडली. हा अपघात आज (सोमवारी) दुपारी 12 वाजताच्या सुमारास जिंतूर तालुक्यातील रिडज पाटीजवळ घडली. गती कमी असल्याने बसमधील प्रवाशांना कुठलीही इजा झाली नाही.
जिल्ह्यात सध्या बहुतांश ठिकाणच्या रस्त्यांची कामे सुरू होती. मात्र, लॉकडाऊनमुळे ही कामे रेंगाळली आहेत. या कामांवर पडलेल्या मुरुमाची आता वाहनांच्या रहदारीमुळे माती झाली आहे. परिणामी जिंतूरपासून 10 किमी अंतरावर असलेल्या रिडज पाटीजवळ बस (एमएच- 20 बीएल-1104) समोरून येणाऱ्या मोटारसायकल वाचवण्यासाठी बाजूला जात होती. मात्र, त्या प्रयत्नांत रस्त्यावरच्या चिखलामुळे ही बस रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या नाल्याच्या खड्ड्यात जाऊन पडली. ही बस परभणीवरून जिंतूरकडे जात होती. सुदैवाने बसची गती अत्यंत कमी असल्याने ती अलगद घसरली. त्यामुळे बसमधील 11 सर्व प्रवाशी सुखरुप आहेत.
बस चालक एस.एल. दुबळकर आणि वाहक मस्के यांनी सतर्कता दाखवून बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. तसेच आगारात कळवून अन्य बसच्या माध्यमातून प्रवाशांना पुढे पाठवले. त्यानंतर काही वेळात आलेल्या अन्य बसच्या साहाय्याने ही बसला खड्ड्यातून बाहेर काढण्यात आले.
परभणी-जिंतूर दरम्यानचा राष्ट्रीय महामार्ग देखील असाच चिखलमय बनला आहे. ही वाहनधारकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. या रस्त्यावर देखील मोठ्या प्रमाणात आणि सातत्याने दुचाकी आणि चारचाकी वाहने घसरत असल्याने त्यांना कसरत करावी लागत आहे. विशेषतः, या रस्त्यांवरून घसरून दुचाकीस्वारांचे मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. त्यामुळे या कामांची गती वाढून ही कामे तत्काळ पूर्ण करावीत, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.