परभणी - इस्राईलच्या धर्तीवर मराठवाडा वॉटर ग्रिडची योजना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्यक्षात आणली. शेतकऱ्यांसाठी त्यांचे योगदान मोठे असून, त्यांची आता राज्याला व शेतकऱ्यांना गरज आहे. त्यामुळे "फडणवीस साहेब, तुम्ही केंद्रात जाऊ नका, तुम्हाला अर्थ खाते दिले तरी जाऊ नका, तुम्ही महाराष्ट्रात असणे आवश्यक आहे." असे आवाहन राज्याचे माजी पाणीपुरवठा मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी आज (शुक्रवारी) परभणीत प्रत्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनाच केले.
हेही वाचा - तुषार गांधींचा कार्यक्रम रद्द करण्यामागे 'फॅसिस्ट' शक्ती - कुमार सप्तर्षी
परभणीच्या संत तुकाराम महाविद्यालयाच्या मैदानावर आज कृषी संजीवनी महोत्सवाचे उद्घाटन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी मार्गदर्शनपर भाणणात लोणीकर बोलत होते. ते म्हणाले, माजी फडणवीस यांनी आपल्या कार्यकाळात इस्राईलच्या धर्तीवर मराठवाडा वॉटर ग्रीड मंजूर केला. मराठवाड्याच्या शेतीला, उद्योगधंद्याला पाणी देण्यासाठी ही योजना मंजूर करून वीस हजार कोटी रुपयांचा निधी दिला. मराठवाड्याचा दुष्काळाचा कलंक कायमचा मिटवण्यासाठी त्यांनी माझ्या खात्याला त्यावेळी मंत्रिमंडळातून 10 हजार कोटी रुपये सुद्धा दिले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शेतकऱ्यांसाठी रेकॉर्डब्रेक काम केले आहे. त्यामुळे कृपा करून तुम्ही दिल्लीत जाऊ नका. शेतकऱ्यांना तुमची गरज आहे, आम्हाला तुमची गरज असल्याचे ते म्हणाले.
दरम्यान, या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर कुलगुरू डॉ. अशोक ढवण, आमदार मेघना बोर्डीकर, माजी आमदार मोहन फड, गजानन घुगे, विजय गव्हाणे, भाऊराव देशमुख, संयोजक आनंद भरोसे आदींसह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील शेतकरी महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा - जान्हवीची झलक टिपण्यासाठी फोटोग्राफरची धडपड, थोडक्यात टळला अपघात