परभणी - 'कोरोना'च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची तत्काळ निर्मिती करावी, या मागणीसाठी परभणीकरांचा लढा सुरू आहे. या अंतर्गत बुधवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ जोरदार सर्वपक्षीय शक्तिप्रदर्शन झाल्याचे दिसून आले. विशेषत: यामध्ये युवकांचा सहभाग लक्षणीय होता. दरम्यान, 1 सप्टेंबरपासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी बेमुदत धरणे आंदोलनाला सुरुवात झाली आहे. यामध्ये खासदार संजय जाधव, आमदार डॉ.राहुल पाटील, आमदार सुरेश वरपुडकर यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी आणि जिल्ह्यातील युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. दरम्यान या आंदोलनात कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याचे चित्र पाहायला मिळाले.
वैद्यकीय महाविद्यालयासाठी सर्वपक्षीयांचे जोरदार शक्तीप्रदर्शन आंदोलनस्थळाबाहेरही युवकांची गर्दी -
परभणीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी आवश्यक त्या क्षमतेचे जिल्हा रुग्णालय असताना देखील शासनाकडून महाविद्यालयाची निर्मिती केल्या जात नसल्याबद्दल परभणीकरांमध्ये तीव्र संताप आहे. त्याच पार्श्वभूमीवर खासदार संजय जाधव यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळील आंदोलनस्थळी भव्य मंडप उभारण्यात आला आहे. त्या मंडपात हजारो युवा आंदोलनकर्त्यांची गर्दी दिसून आली. त्यामुळे मंडपातील जागा अपुरी पडल्याने आंदोलनस्थळाबाहेर रस्त्यांवर देखील युवक थांबल्याचे चित्र यावेळी दिसून आले. यावेळी वैद्यकीय महाविद्यालयाच्या मागणीची घोषणाबाजी करत युवा कार्यकर्त्यांनी संपूर्ण आंदोलनस्थळ अक्षरशः दणाणून सोडला होता.
वैद्यकीय महाविद्यालयासाठी सर्वपक्षीयांचे जोरदार शक्तीप्रदर्शन रॅलीच्या माध्यमातून आंदोलक दाखल - या आंदोलनासाठी शहरातील तसेच जिल्ह्यातील आंदोलनकर्ते गुरुवारी सकाळपासूनच वाजत गाजत रॅलीच्या माध्यमातून आंदोलनस्थळी दाखल झाले. विशेषतः शिवसेना खासदार संजय जाधव, काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार सुरेश वरपुडकर, आमदार डॉ. राहुल पाटील, ज्येष्ठनेते विजय वाकोडे, महापौर अनिता सोनकांबळे, रवि सोनकांबळे, माजीमहापौर प्रताप देशमुख, उपमहापौर भगवान वाघमारे, गटनेते माजूलाला, सेनेचे जिल्हाप्रमुख विशाल कदम यांच्यासह महापालिकेच्या आजी-माजी पदाधिकारी, सदस्यांच्या नेतृत्वाखाली ठिकठिकाणच्या प्रभागातून वाजत गाजत, प्रचंड घोषणा देत आंदोलनस्थळी पोहोचल्याने संपूर्ण शहरालाच आंदोलनाचे स्वरूप आले आहे.
वैद्यकीय महाविद्यालयासाठी सर्वपक्षीयांचे जोरदार शक्तीप्रदर्शन पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांचे आक्रमक भाषणे -यावेळी विविध पक्षांच्या ज्येष्ठनेते मंडळींसह सामाजिक व अन्य संघटनांच्या युवा पदाधिकार्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मागणीच्या पूर्ततेकरीता निर्णायक लढाईचा संकल्प केला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे हक्काचे आहे. त्याच्या पूर्ततेसाठी आम्ही सर्वस्व पणास लावू, अशी भिष्म प्रतिज्ञाही आंदोलनकर्त्यांनी केली. यावेळी काही आंदोलनकर्त्यांनी आक्रमकपणे भूमिका मांडली. सरकारने आढेवेढे न घेता गुणवत्तेच्या आधारावरच महाविद्यालय मंजूर करावे, त्या संबंधीची घोषणा करावी, असा आग्रह धरला.
'अस्मितेचा प्रश्न; मागे हटणार नाही' - खासदार संजय जाधव'शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तात्काळ सुरू झाले पाहिजे हा आता आमच्या अस्मितेचा प्रश्न बनला आहे. जनतेच्या भावना तीव्र आहेत आणि आज युवाशक्ती एकवटली आहे. मागणी पूर्ण झाल्याशिवाय मागे हटणार नाही. सगळे निकष पुर्ण झालेले असून जागेचाही प्रश्न लवकरच मार्गी लागेल. आता जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी आपापल्या पक्षप्रमुखांच्या माध्यमातून हा विषय कॅबिनेटसमोर आणून मंजुरीसाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन यावेळी खासदार संजय जाधव यांनी केले.
7 सप्टेंबरपासून प्राणांतिक उपोषण - खासदार संजय जाधव'या धरणे आंदोलनात युवकांप्रमाणे सर्व घटकातील नागरिक, महिला, धार्मिक क्षेत्रातील सर्वधर्मीय मंडळी, प्राध्यापक, शिक्षक, डॉक्टर्स, वकील मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. येत्या चार दिवसांत काहीच निर्णय न झाल्यास 5 सप्टेंबरला पुढील आंदोलनाची रूपरेषा स्पष्ट करु, असे सांगतानाच खासदार जाधव हे स्वतः 7 सप्टेंबर रोजी प्राणांतिक उपोषणाला बसणार असल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय मागणी पुर्ण न झाल्यास खासदारकीचा राजीनामा द्यायलाही मागेपुढे पाहणार नाही, असेही ते म्हणाले.
'मागणी पदरात पडल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही - आमदार पाटील यावेळी आमदार डॉ.राहूल पाटील म्हणाले की, खासदारांच्या नेतृत्वाखाली जनतेचा रेटा असल्याने शासनाला कोणत्याही परिस्थितीत परभणीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय द्यावेच लागेल. कारण परभणीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची अत्यंत गरज आहे. मागणी पदरात पडल्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही.
'पीपीपी' कॉलेज हिताचे नाही - आमदार वरपूडकर याप्रसंगी आमदार सुरेश वरपूडकर म्हणाले की, लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नांतून सरकारने विधानसभेत घोषणा केल्यानंतर परभणीला खासगी तत्वावरील म्हणजे पीपीपी मेडीकल कॉलेज मंजूर झाले आहे. मात्र, ते सामान्य जनतेच्या हिताचे नाही. त्यामुळे शासकीयसाठी हा लढा निर्णायक ठरेल. शासन दरबारी जनतेचा रेटा असाच सुरू ठेवू आणि शासकीय मेडीकल कॉलेज मिळवू असा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला. तर यावेळी गणपत भिसे, राजन क्षीरसागर, गुलमीर खान, किर्तीकुमार बुरांडे, स.अब्दुल कादर, विजय वाकोडे आदींनी मनोगत व्यक्त केले.
आंदोलनात यांचा सहभाग - या आंदोलनात माजीमहापौर प्रताप देशमुख, उपमहापौर भगवानराव वाघमारे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विशाल कदम, गटनेते माजूलाला, माजी नगराध्यक्ष जयश्री खोबे, माजी नगराध्यक्ष बंडू पाचलिंग, माजी जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आनेराव, प्रा. रामभाऊ घाडगे, रवी पतंगे, गजानन देशमुख, डाँ.विवेक नांवदर, विखार अहमद खान, नदीम इनामदार, जाकीर खान, नागेश सोनपसारे, किर्तीकुमार बुरांडे, राजन क्षीरसागर, परवेज हाश्मी, लियाकत अन्सारी, डी.एन.दाभाडे, अर्जुन सामाले, दिनेश बोबडे, पंढरीनाथ घुले, प्रा.पंढरीनाथ धोंडगे, नगरसेवक गणेश देशमुख, श्रीधर देशमुख, विनोद कदम, बबन मुळे, प्रवीण गोमचाळे, पाशा कुरेशी, अमोल जाधव, सचिन अंबिलवादे, अमोल पाथरीकर, मनपा सदस्य चंदू शिंदे, विश्वजीत बुधवंत, प्रशांत ठाकूर, संजय कुलकर्णी, महापालिका सदस्य सचिन देशमुख, सय्यद खादर, शेख रफीक, सोहेल खान, मुजाहेद मेमन बाळासाहेब फुलारी, विकास लंगोटे, जानू बी, झैलसिंग बावरी यांच्यासह जिल्ह्यातील युवावर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाला होता.