परभणी - जिल्ह्यातील गंगाखेड नगरपालिकेच्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे सभागृहात चक्क गटारी साजरी करण्यात आली आहे. याठिकाणी मांसाहारसह मद्यपान देखील झाल्याचा आरोप होत आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत देखील कैद झाला आहे. त्यावरून मुख्याधिकाऱ्यांसह या पार्टीत सहभागी झालेल्या लोकप्रतिनिधी आणि अधिकारी, कर्मचाऱ्यांवर देखील कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेसह काँग्रेस, मनसे आणि अन्य काही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
नगराध्यक्ष-उपनगराध्यक्षांच्या दालनातही मद्यप्राशन
गंगाखेड नगरपरिषदेच्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे सभागृहात ८ ऑगस्ट रोजी गटारी साजरी करण्याचा निंदनिय आणि संतापजनक प्रकार पुढे आला आहे. या सभागृहात काही लोक मांसाहारी जेवण घेत असल्याचे सीसीटीव्ही चित्रणात दिसून आले असून, काही लोकांनी नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांच्या केबिनमध्ये मद्यप्राशन केल्याची चर्चा आहे, असा आरोप शिवसेनेच्या वतीने नगरसेविका संगीता राखे, उपजिल्हाप्रमुख विष्णू मुरकुटे, शिक्षकसेनेचे नेते बाळासाहेब राखे यांनी निवेदनाद्वारे केला आहे.
शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा
दरम्यान, गंगाखेड नगरपरिषदेच्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे सभागृहात शहराच्या हिताचे निर्णय घेतले जातात. अशा पवित्र सभागृहाचे पावित्र्य काही लोकांनी भंग केले आहे. हा प्रकार नगरपरिषद प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे घडला आहे. या संपूर्ण प्रकरणाची कसून चौकशी होणे आवश्यक आहे. तसेच या प्रकारास थेट जबाबदार असलेले मुख्याधिकारी संतोष लोमटे व संबंधित कर्मचारी यांच्यावर तातडीने कठोर कार्यवाही करण्यात यावी, अन्यथा शिवसेना व समविचारी पक्षांच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देखील देण्यात आला आहे.
'लोकप्रतिनिधींचा सहभाग संतापजनक'
गंगाखेड पालिकेच्या सभागृहात रविवारी रात्री घडलेला 'गटारी'चा प्रकार अत्यंत निंदनीय असल्याचे काँग्रेसचे तालुकाप्रमुख गोविंद यादव यांनी सांगितले आहे. ज्या सभागृहात शहराच्या विकासाचे निर्णय घेतले जातात, त्या सभागृहामध्ये अशा पद्धतीने गटारी साजरी करणे आणि त्यामध्ये लोकप्रतिनिधी सहभागी असणे, हे अतिशय संतापजनक आहे, असे देखील ते म्हणाले. त्यामुळे या प्रकाराला जे कोणी जबाबदार असतील, अशा सर्वांवर तातडीने कारवाई केली पाहिजे, अशी मागणी यादव यांनी केली आहे.
'शौकीन नगरसेवक, कर्मचाऱ्यांचा प्रताप नगराध्यक्षांनी राजीनामा द्यावा'
गंगाखेड नगरपालिकेत काही शौकीन नगरसेवक आणि कर्मचाऱ्यांनी रविवारी गटारी साजरी करण्याचा प्रताप केला आहे. हा प्रकार अत्यंत संतापजनक आहे. या प्रकारात सहभागी असलेल्या सर्वांवर कारवाई झालीच पाहिजे आणि त्यासोबतच नगराध्यक्ष विजयकुमार तापडिया यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी मनसेचे जिल्हाध्यक्ष बालाजी मुंडे यांनी केली आहे. तर पालिकेच्या मुख्य अधिकाऱ्यांची जिल्हाधिकार्यांनी तत्काळ हकालपट्टी करावी, असे देखील ते म्हणाले.
मंत्रालयातही आढळले दारूच्या बाटल्या
सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय ज्या मंत्रालयातून घेतले जातात. राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोक येथे ये-जा करत असतात. मंत्रालयात पास शिवाय प्रवेश दिला जात नाही. त्यातच कोरोनामुळे देखील सर्वांना प्रवेश दिला जात नाही. ज्यांना प्रवेश मिळतो त्यांची काटेकोर तपासणी केली जाते. मात्र, त्याच मंत्रालयाच्या आवारात आता दारूच्या बाटल्या सापडू लागल्या आहेत. मंत्रालयात राजपात्रित अधिकाऱ्यांच्या उपहारगृहाच्या खालील बाजूस एक खोली आहे. तिथे दारूच्या बाटल्या सापडल्या आहेत. या बाटल्या मंत्रालयात गेल्याच कशा? त्या नेमक्या कुणाच्या? असा प्रश्न विचारला जात आहे.
हेही वाचा- थेट मंत्रालयातच 'चिअर्स'! दारूच्या बाटल्या सापडल्या, विरोधक आक्रमक