परभणी - गेल्या महिन्याभरापासून राजकीय प्रचाराची सुरू असलेली धामधूम आज (मंगळवारी) थांबली. यानंतर निवडणूक प्रशासनाने मतदानासाठी तयारी सुरू केली आहे. परभणी लोकसभा मतदारसंघातील ६ विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या तब्बल १९ लाख ८३ हजार ९०२ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यासाठी २ हजार १७४ मतदान केंद्रांची स्थापना करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी पी. शिवाशंकर यांनी दिली.
परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये १७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. येथील मतदान प्रक्रिया अवघ्या ४८ तासावर येऊन ठेपली आहे. त्यासाठी जिल्हा तथा निवडणूक प्रशासनाने तयारी सुरू झाली आहे. मतदान प्रक्रिया, मतदारांची संख्या, संवेदनशील केंद्र, आचारसंहिता भंग करण्यात आल्याबाबत दाखल करण्यात आलेले गुन्हे आणि सुरक्षा यंत्रणा याबाबत जिल्हा प्रशासनाने आज मंगळवारी सायंकाळी पत्रकारांना माहिती दिली.
परभणी लोकसभा मतदारसंघात परभणी जिल्ह्यातील जिंतूर, परभणी, गंगाखेड, पाथरी आणि जालना जिल्ह्यातील परतूर व घनसावंगी विधानसभा क्षेत्रांचा समावेश होतो. या एकूण ६ विधानसभा क्षेत्रांमध्ये १० लाख ३२ हजार ८७७ पुरुष मतदार असून ९ लाख ५१ हजार १५ स्त्री मतदार आहेत. याशिवाय इतर १० मतदार असून एकूण १९ लाख ८३ हजार ९०२ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. याशिवाय निवडणूक आणि सैन्यदलात सीमेवर तैनात असणारे १३२५ मतदार आहेत. या सर्व मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी २ हजार १७४ मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये सैन्यदलात आणि बाहेरगावी असणारे १ हजार १६५ टपाली मतदार आहेत.
- अशी असेल मतदार प्रक्रियेची यंत्रणा
जिल्हा प्रशासनाने मतदानाची प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी विशेष वाहतूक आराखडा तयार करण्यात आला आहे. यामध्ये ७३७ वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये २०१ बस ४६१ जीप ३९ मिनीबस ७ ट्रक आणि इतर २९ वाहनांचा समावेश आहे. निवडणूक आयोगाच्या नवीन संकल्पनेनुसार परभणी लोकसभा मतदारसंघात संपूर्ण स्त्री कर्मचारी असलेल्या सखी मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये ११ मतदान केंद्र स्थापण्यात आली आहेत.
परभणी लोकसभा मतदारसंघात दिव्यांग मतदारांची संख्या देखील मोठी आहे. शारीरिक अपंग अंध आणि कर्णबधीर असे एकूण ६ हजार ४९३ मतदार आहेत. या मतदारांना त्यांच्या घरातून मतदार केंद्रापर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच मतदान केंद्रावर व्हिलचेअरद्वारे त्यांना प्रत्यक्ष मतदान मशीनपर्यंत पोहोचविले जाईल. शिवाय अंध मतदारांना ब्रेल लिपीच्या माध्यमातून माहिती दिली जाणार आहे.
- कृषी विद्यापीठात स्ट्राँग रूम
संपूर्ण लोकसभा मतदारसंघात होणारे मतदान ज्या ईव्हीएम मशीनमध्ये बंदिस्त होणार आहे. त्या मशीन्स ठेवण्याची व्यवस्था वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयात करण्यात आली आहे. हा परिसर निवडणूक विभागाने गेल्या काही दिवसांपूर्वी ताब्यात घेतला आहे. या परिसरात कलम १४४ लागू करण्यात आले आहे. या ठिकाणच्या ६ खोल्यांमध्ये स्ट्राँग रूमची निर्मिती करण्यात आली आहे. याच ठिकाणी २३ मे ला सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे.