परभणी - आम्हाला मोठ्या प्रमाणावर नौकऱ्या उपलब्ध करायच्या आहेत. पण तुम्ही जे शिकत आहात त्यातून नौकरी मिळेल का? कारण नौकऱ्या पुढच्या पन्नास वर्षांचा विचार करत आहेत आणि आपले शिक्षण मागच्या पन्नास वर्षांचा विचार करते आहे. त्यामुळे बेरोजगारी मुक्त महाराष्ट्र घडवायचा असेल तर आपल्याला एकत्र येऊन शिक्षण बदलावे लागेल. तरच महाराष्ट्र घडेल, असे युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. ते शनिवारी परभणीत बोलत होते.
आदित्य ठाकरे जन आशीर्वाद दौऱ्यानिमित्त परभणीत आले होते. यावेळी त्यांनी आमदार डॉ.राहुल पाटील यांनी आयोजित केलेल्या रोजगार मेळाव्याचे आणि दिव्यांगांना साहित्याचे वाटप करणाऱ्या शिबिराचे उद्घाटन केले.
यावेळी व्यासपीठावर आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरण मंत्री रामदास कदम, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, माजी मंत्री सचिन आहेर, खासदार संजय जाधव, लक्ष्मणराव वडले, आमदार डॉ. राहुल पाटील, डॉ. विवेक नावंदर, जिल्हाप्रमुख विशाल कदम, गंगाप्रसाद आनेराव आदींसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सर्वप्रथम आदित्य ठाकरे यांनी रोजगार मेळाव्या निमित्त उपस्थित तरुणांशी संवाद साधला. त्यानंतर त्यांच्या हस्ते तब्बल दीड हजार दिव्यांगांना त्यांच्या गरजे नुसार उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले.
आदित्य ठाकरे म्हणाले, नवा महाराष्ट्र म्हणजे काही माझ्या स्वप्नातला महाराष्ट्र नाही. तर तुमच्या सर्वांच्या स्वप्नातला तो महाराष्ट्र असेल आणि तसाच महाराष्ट्र घडविण्यासाठी मला तुमची साथ हवी आहे. सुरक्षित आणि सुशिक्षित महाराष्ट्र बनवायचा म्हणून सर्व तरुणांनी एकत्र येण्याची गरज आहे. सर्वांना नोकरी उपलब्ध करून द्यायची आहे. बेरोजगारमुक्त महाराष्ट्र, कर्जमुक्त महाराष्ट्र, दुष्काळमुक्त महाराष्ट्र आणि प्रदूषणमुक्त महाराष्ट्र करायचा आहे. म्हणून तुमची साथ मागायला आज येथे आलो आहे. तुम्ही सोबत राहणार की नाही? असा प्रश्न करत आदित्य ठाकरे यांनी उपस्थित युवकांची दाद मिळवली. यानंतर त्यांनी काही तरुण-तरुणींशी जवळ जाऊन संवादही साधला. अनेकांनी आदित्य ठाकरे यांच्यासोबत सेल्फी घेतल्या.
तत्पूर्वी, आमदार डॉ. राहुल पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकात आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्यासाठी आम्ही जिवाचे रान करू. तसेच परभणी जिल्ह्यातील चारही विधानसभांवर भगवा फडकवू, अशी ग्वाही त्यांनी दिली.
या कार्यक्रमात पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद आणि इतर काही महानगरांमधून तब्बल 185 कंपन्यांचे अधिकारी सुशिक्षित बेरोजगारांच्या मुलाखती घेण्यासाठी आले होते. यावेळी परभणी जिल्ह्यातील 6 हजार 900 सुशिक्षित तरुणांनी मुलाखतींसाठी नाव नोंदणी केली. शहरातील नूतन महाविद्यालयाच्या सुमारे 36 खोल्यांमध्ये या मुलाखती दिवसभर घेण्यात आल्या. तसेच यावेळी 1 हजार 500 दिव्यांगांना त्यांच्या गरजेनुसार साहित्याचे वाटप करण्यात आले. यामध्ये तीन चाकी सायकल, कृत्रिम पाय-हात, श्रवण यंत्र आणि इतर साहित्यांचा समावेश होता.