परभणी - शाळकरी विद्यार्थ्याचे अपहरण करून त्याच्या पालकांना खंडणी मागणाऱ्या दोन आरोपींना परभणी जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. व्ही. कश्यप यांनी आज (शुक्रवारी) जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. ही घटना 2017 मधील असून, या प्रकरणात नानलपेठ पोलिसांनी तत्काळ चक्रे फिरवून मुलाची सुखरूप सुटका करत आरोपींना लातूर जिल्ह्यातून जेरबंद केले होते.
अभिषेक अन्सिराम दावलबाजे (12) असे अपहरण झालेल्या मुलाचे नाव आहे. तो शहरातील गवळी गल्लीत राहणाऱ्या उषा अन्सिराम दावलबाजे यांचा मुलगा मुलगा असून, बालविद्या मंदिर प्रशालेत शिक्षण घेतो. 24 ऑक्टोबर 2017 रोजी अभिषेकचे दोन व्यक्तींनी अपहरण केले होते. त्यानंतर अपहरणकर्त्यांनी अन्सिराम दावलबाजे यांना फोन करून खंडणीची मागणी केली होती.
अभिषेक हा शहरातील इदगाह मैदानावर त्याच्या मित्रासोबत दररोज क्रिकेट खेळण्यासाठी जात असे. त्यानुसार 23 ऑक्टोबर 2017 रोजी या ठिकाणी आलेल्या दोन व्यक्तींनी अभिषेकला चांगले क्रिकेट खेळतो म्हणून वीस रुपये बक्षीस दिले होते. त्यावेळी त्यांनी उद्या चांगले क्रिकेट खेळल्यास तुला बॅट देतो, असे सांगून दुसऱ्या दिवशीही इदगाह मैदानावर बोलविले. त्यानंतर 24 ऑक्टोबरला घरातून गेलेला अभिषेक परतला नाही, म्हणून त्याच्या पालकांनी त्याचे मित्र सुमीत साठे व विजय उजवणकर यांच्या घरी जावून विचारपूस केली. तेव्हा 'अभिषेक आज एकटाच इदगाह मैदानाकडे गेला, आम्ही सोबत नव्हतो', असे त्यांनी सांगितले. त्यामुळे अभिषेकच्या आईने नानलपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने तापासाची चक्रे फिरवून उदगीर (जि. लातूर) येथून आरोपी जिलानी ख्वाजा शिकलकर व कलीम शहानुर शिकलकर या दोन आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्या तावडीतून मुलांची सुखरूप सुटका केली.
या प्रकरणी दोन्ही आरोपींवर गुन्ह्याची नोंद झाली. त्यानंतर 2018 साली फौजदार द्रोणाचार्य यांनी दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे ११ साक्षीदार तपासण्यात आले. सरकारी अभियोक्ता अॅड. ज्ञानेश्वर दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक सरकारी अभियोक्ता मयुर साळापूरकर यांनी काम पाहिले. सरकारी अभियोक्तांचा युक्तीवाद ग्राह्य धरुन न्यायाधीश डी.व्ही. कश्यप यांनी दोन्ही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
दरम्यान, या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी नानलपेठ पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरविली. आपहरणकर्त्यांचा काही तासातच शोध घेतला. यासाठी सहायक पोलिस निरीक्षक सुनील पुंगळे, फौजदार अनिल सनगले, पोलिस कर्मचारी संजय पुरी, सय्यद उमर, किरण भुमकर, रंगनाथ दुधाटे यांनी विशेष कामगिरी बजावली आहे.