परभणी - जिंतूर तालुक्यातील एका गावात जमिनीखालील गुप्तधन काढण्यासाठी जिंतूर शहरात आलेल्या टोळीला पोलिसांनी अटक करून मंगळवारी (18 ऑगस्ट) न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने या टोळीतील मांत्रिकासह व्यापारी आणि त्यांच्या 7 सहकाऱ्यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
जिंतूर शहरातील एका व्यापाऱ्याने जिंतूर जवळील देवगाव परिसरात गुप्तधन असल्याच्या कथित माहितीनुसार अकोला येथून मांत्रिकांची टोळी बोलावली. त्यानुसार ही टोळी सोमवारी (दि. 17 ऑगस्ट) पहाटेच्या सुमारास एका वाहनाने शहरात दाखल झाली. यावेळी गस्तीवर असलेले फौजदार रवि मुंडे व त्यांच्या सहकारी पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांच्या संशयास्पद हालचालीवरुन वाहनाची तपासणी केली. त्यात जमीन खोदण्यासाठीचे व पुजेचे साहित्य आढळून आले. त्यामुळे मांत्रिकासह त्यांच्या सहकाऱ्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, हा सर्व प्रकार उघडकीस आला.
त्यानंतर या संदर्भात पोलीस कर्मचारी अनिल इंगोले यांच्या तक्रारीवरुन रात्री उशिरा पोलीस ठाण्यात जिंतूरातील व्यापारी अब्दुल रज्जाक, जफर अली व मांत्रिक रमेश जंजाळ, वाहन चालक अश्विन नेमाडे, तुषार रोकडे, दिलीप आढाव, शुभम पाटील, करण ठाकूर, मोहंमद इब्राहिम (रा.अकोला) यांच्या विरुद्ध जादूटोणा कायद्याअंतर्गत विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आला.
त्यानंतर मंगळवारी सर्व संशयितांना न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्यांना 20 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड करत आहेत.