परभणी - आज (शुक्रवार) सायंकाळपर्यंत परभणी शहरातील जिल्हा कारागृहात 351 कैद्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यामध्ये 61 कैदी रॅपिड अँटीजेन टेस्टमध्ये कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. शिवाय महापालिकेने शहरातील 15 केंद्रांवर व्यापाऱ्यांच्या देखील तपासणी केल्या होत्या. ज्यात 6 व्यापारी कोरोनाबाधित आढळुन आले आहेत. दरम्यान, कारागृहात आढळलेल्या कोरोना पॉझिटिव्ह कैद्यांमुळे चिंता व्यक्त होत आहे.
परभणी शहर महानगरपालिकेच्या वतीने आज (शुक्रवार) जिल्हा कारागृहातील 351 कैद्यांची रॅपीड अँटीजेन टेस्टद्वारे तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 61 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तसेच शहरात 15 केंद्रावर व्यापाऱ्यांची रॅपीड अँटीजन टेस्टद्वारे तपासणी करण्यात आली. ज्यामध्ये 345 व्यापाऱ्यांची तपासणी करण्यात आली असून, त्यात 6 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. परभणी शहरात आणि कारागृहात मिळून एकूण 696 जणांची तपासणी करण्यात आली, ज्यात 629 निगेटिव्ह तर 67 पॉझिटिव्ह आढळले आहेत.
हेही वाचा - कोरोना संशयिताचा मृत्यू झाल्यास ना स्वॅब, ना पोस्टमार्टम; नोंद मात्र कोरोना मृत्यूच्या यादीत
परभणी महापालिकेने तयार केलेल्या केंद्रांपैकी शहरातील सिटी क्लब येथे 28 जणांची तपासणी झाली, तर कल्याण नगरातील आयएमए हॉल येथे 36, नानलपेठ येथील बाल विद्या मंदिरात 19 (2 पॉझिटिव्ह), मार्केट कमिटी येथे 29 (1 पॉझिटिव्ह), नुतन महाविद्यालयात 46 (1 पॉझिटिव्ह), अपना कॉर्नर येथील वाचनालयात 53 (1 पॉझिटिव्ह), जागृती मंगल कार्यालय 30 (1 पॉझिटिव्ह), जायकवाडी येथील आरोग्य केंद्रात 29, कोठारी कॉम्प्लेक्स येथे 35, खंडोबा बाजार येथील मनपाच्या आरोग्य केंद्रात 19, खानापूर येथील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात 21 आणि बॅडमिंटन हॉल येथे 95 जणांची तपासणी करण्यात आली.
शिवाय जिल्हा कारागृहात 351 कैद्यांची तपासणी संध्याकाळी उशिरापर्यंत करण्यात आली, त्यात 61 पॉझिटिव्ह आढळले. संध्याकाळी उशिरापर्यंत परभणी जिल्हा कारागृह कैद्यांच्या तपासण्या सुरू होत्या. त्यामुळे कोरोनाबधितांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.