परभणी - जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोनाच्या संसर्गाने डोके वर काढले आहे. आज रविवारी नव्याने आढळलेल्या कोरोनाबधितांची संख्या अचानक वाढली असून, 540 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर केवळ 108 जण कोरोनामुक्त झाल्याची माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. या दरम्यान 8 जणांचा मृत्यू देखील झाला. विशेष म्हणजे गेल्या 15 ते 20 दिवसात कमी होणारी कोरोनाबाधितांची संख्या अचानक वाढल्याने आता परत एकदा चिंता वाढली आहे.
3 हजार 409 ॲक्टिव्ह रुग्ण
जिल्ह्यातील बाधितांची संख्या 48 हजार 401 वर पोहचली असून, त्यातील 43 हजार 794 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने उर्वरीत 3 हजार 409 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, मे महिन्याच्या पहिल्या दिवसापासून कोरोनाचा संसर्ग कमी होत होता. दररोज नव्याने आढळणाऱ्या रुग्णांची संख्या 200 वर पोहचली होती. काल शनिवारी दिवसभरात 220 नवे रुग्ण आढळून आले होते. मात्र आज रविवारी त्यात अचानक वाढ झाली. त्यामुळे 1 मेपासून नव्या बाधितांपेक्षा बरे होऊन घरी परतणाऱ्यांची वाढलेली संख्या पुन्हा घटली आहे. कारण आज केवळ 108 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता आहे.
आतापर्यंत 3 लाख 13 हजार 586 जणांची तपासणी
जिल्ह्यात एप्रिल महिन्यात कोरोनाचे रुग्ण ज्या प्रमाणात वाढत होते, आता त्या प्रमाणात मे महिन्यात घटताना दिसून येत होते. मात्र, आज रविवारी 540 नवीन बाधित आढळले तर 108 कोरोनामुक्त झाले. तसेच गेल्या 24 तासात 8 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सध्या जिल्हा रुग्णालय आणि खाजगी रुग्णालयांच्या कोरोना कक्षात 3 हजार 409 बाधित उपचार घेत आहेत. तर आजपर्यंत एकूण 1 हजार 198 करोनाबाधितांचा मृत्यू झाला. तसेच जिल्ह्यात आजपर्यंत एकूण 48 हजार 401 कोरोनाबाधित व्यक्ती आढळले आहेत. त्यापैकी 43 हजार 794 व्यक्ती कोरोनामुक्त झाले. दरम्यान, जिल्हा रुग्णालय प्रशासनातर्फे आतापर्यंत 3 लाख 13 हजार 586 व्यक्तींचे नमुने तपासण्यात आले. त्यात 2 लाख 65 हजार व्यक्तींचे नमुने निगेटिव्ह आले, तर 48 हजार 401 व्यक्तींचे नमुने पॉझिटिव्ह आले. 1136 अनिर्णायक व 140 नमुने नाकारण्यात आले.
हेही वाचा - नागपुरात म्युकर मायकोसिसमुळे 46 रुग्णांचा मृत्यू, 343 रुग्णांवर उपचार सुरू