परभणी - जिल्ह्यातील गंगाखेड शहरात एका टपरीवर पान खाण्यात व्यस्त असलेल्या व्यापाऱ्याच्या मोटारसायकलला लावलेली रोकड असलेली बॅग चोरट्यांनी लंपास केली. या बॅगेत दोन लाख 58 हजार रुपये होते. याप्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात सोमवारी उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा - विविध मागण्यांसाठी आझाद मैदान येथे रेल्वे प्रवाशांचे धरणे आंदोलन
रंगनाथ रामराव जाधव असे या व्यापाऱ्याचे नाव आहे. ते गंगाखेड शहरातील डॉक्टर लाईन परिसरातील रहिवाशी आहेत. ते नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी त्यांच्या घरातून नवा मोंढा भागातील जिजाऊ ट्रेडिंग येथे जाण्यासाठी दुचाकी (एमएच. २२, एक्यू. ५१५१ ) वरून निघाले होते. घरून निघत असताना त्यांनी दुचाकीच्या हँडलला अडकवलेल्या बॅगमध्ये दोन लाख ५८ हजार रुपये ठेवले होते.
नवा मोंढा परिसरात येताच ते पान टपरीजवळ दुचाकी लावून पान खाण्यासाठी गेले. परंतु, याचवेळी त्यांच्या पाळतीवर असलेल्या चोरट्यांनी त्यांची नजर चुकवून दुचाकीला लावलेली पैशाची बॅग पळवून नेली. रंगनाथ जाधव पानटपरीवरून पान खाऊन दुचाकीजवळ आले. मात्र, त्यांना दुचाकीच्या हँडलला लावलेली बॅग कोणीतरी नेल्याचे लक्षात आले. त्यांनी परिसरात शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, बॅग घेऊन गेलेल्या चोरट्यांचा शोध व ओळख पटू शकली नाही.
त्यांनी घटनेनंतर बराच काळ शोध घेतला. पण, काहीच हाती लागत नसल्याने त्यांनी पोलीस ठाणे गाठून पैशाची बॅग चोरीला गेल्याची तक्रार दिली. त्यानुसार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून चोरट्यांचा शोध सुरू केला. मात्र, पोलिसांना चोरट्यांचा अद्याप कुठलाही सुगावा लागलेला नाही. त्यामुळे गंगाखेड पोलीस चोरट्यांचा माग काढण्यासाठी बाजारातील काही सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करत आहेत. दरम्यान, या घटनेने व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण असून नेहमीच घडणाऱ्या अशा घटनांमुळे पोलिसांचे नियंत्रण कमी होत असल्याचे दिसून येत आहे.