परभणी - 'कोरोना'ची दहशत संपूर्ण जगात निर्माण झाली असून, या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन तर महाराष्ट्रात संचारबंदी लागू आहे. मात्र या परिस्थितीचे गांभीर्य न ओळखता रस्त्यावर फिरणाऱ्यांची संख्या कमी होताना दिसत नाहीये. त्यामुळे परभणी पोलिसांनी कारवाईचा बडगा उचलत गेल्या काही दिवसात १७६ वाहने जप्त करत १२३ लोकांवर कारवाई केली आहे.
कोरोना विषाणूच्या प्रसाराच्या संदर्भाने जिल्हयामध्ये उद्भवलेल्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस दलाकडून विविध प्रकारे जनजागृती करण्यात येत आहे. शिवाय टवाळखोरांवर आळा घालण्यासाठी ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच जिल्हयाच्या सीमेवर ८ नाकाबंदी पॉइंट सुरू आहेत. कोणत्याही वाहनांना जिल्हा हद्दीत व जिल्हा हद्दीबाहेर परवानगीशिवाय प्रवेश दिला जात नाही. राज्यातील व परराज्यातील स्थलांतरीत लोकांना व त्यांच्या वाहनांना ताब्यात घेवन रिलीफ कॅम्पमध्ये त्यांची सोय करण्यात येत आहे. तसेच भाजी मंडई, किराणा दुकान या ठिकाणी गर्दी होऊ नये, म्हणून योग्य त्या उपाययोजना केल्या जात असून महत्त्वाच्या ठिकाणी बंदोबस्त लावण्यात आला आहे.
जिल्हा हद्दीत सतत सतर्क पेट्रोलिंग सुरू आहे. कोरोनासंसर्ग होऊ नये म्हणून जमावबंदी आदेश लागू असून आज (बुधवारी) जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या १४ आरोपींविरुद्ध ९ गुन्हे दाखल केले आहेत. तसेच आतापर्यंत जिल्ह्यात एकूण ५३ गुन्हे दाखल असून १२३ आरोपींवर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा व भारतीय दंड संहितेनुसार कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय गेल्या २४ तासात विनाकारण फिरणाऱ्या वाहनधारकांविरुद्ध कारवाई करत ७९ वाहने जप्त केली आहेत. तर संचारबंदीच्या आजपर्यंतच्या काळात दुचाकी, तीनचाकी व चारचाकी वाहनधारकांवर कारवाई करून १७६ वाहने जप्त करण्यात आली आहेत. दरम्यान, पुणे, मुंबई अशा मोठ्या शहरातून ज्यांनी स्थलांतर केले आहे. तसेच प्रवास केला आहे, किंवा तबलिगी जमातीच्या दिल्ली येथील कार्यक्रमात सहभागी झालेल्या लोकांना कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता असल्याने त्यांनी स्वतःहून प्रशासनाला संपर्क करावा आणि वैद्यकिय तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
पोलिसांचे समाजकार्य-
जिल्ह्यामध्ये एकूण ७ ठिकाणी रिलीफ कॅम्प चालू असून त्यामध्ये परप्रांतीय व राज्यातील स्थलांतरीत कामगार व गरजूंना ठेवण्यात आले आहे. त्यात १४० पुरुष तर ३० महिला आणि ५९ मुले असे एकुण २२९ स्थलांतरितांचा समावेश आहे. त्यांना या रिलीफ कॅम्पमध्येच राहण्याची व जेवणाची सोय स्वंयसेवी संस्थांमार्फत उपलब्ध करून देण्यात आली आहे.