परभणी - जिल्ह्यातील ६० परीक्षा केंद्रांवर आज बारावीची इंग्रजी विषयाची परीक्षा पार पडली. या परीक्षेसाठी २४ हजार १२९ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यातील प्रत्यक्षात २३ हजार ३६९ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. या परीक्षेदरम्यान भरारी पथकांनी कारवाई करून १५ कॉपी बहाद्दरांना रंगेहात पकडून बडतर्फ केले.
परीक्षेसाठी सर्वच परीक्षा केंद्रांवर बैठे पथक तैनात करण्यात आले होते. याशिवाय ३३ भरारी पथकांची निर्मिती करण्यात आली होती. या भरारी पथकाकडून केंद्रांवर अचानक भेटी देऊन तपासण्या करण्यात येत होत्या. या तपासणी दरम्यान गंगाखेड तालुक्यातील महातपुरीच्या कै. रामकृष्ण बापू उच्च माध्यमिक विद्यालय परीक्षा केंद्रावर तब्बल ९ कॉपीबहाद्दरांना पकडण्यात आले. याशिवाय सेलूच्या न्यू हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयात एका विद्यार्थ्यावर तर मानवत तालुक्यातील रत्नापूरच्या कला व वाणिज्य महाविद्यालयातील ५ कॉपीबहाद्दरांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली. शिक्षण विभागाकडून बैठे आणि भरारी पथकाद्वारे कडक कारवाई होत असल्याने गेल्या १० वर्षात कॉपीबहाद्दरांवर चांगला आळा बसला आहे.
हेही वाचा - VIDEO: छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजीराजेंच्या काळातील एकमेव सरसेनापती..
एकूण अर्ज केलेल्या पैकी ७६० विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली नाही. दरम्यान, या परीक्षेसाठी ९६.८५ टक्के परीक्षार्थ्यांनी उपस्थिती लावल्याची माहिती शिक्षण विभागाच्यावतीने देण्यात आली. परीक्षेदरम्यान चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याने कुठेही गैरप्रकार घडला नाही.