पालघर(वाडा) - जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील कोहज किल्ल्यावर ट्रेकिंग करून परतत असताना मुंबईतील तरुणीचा मृत्यू झाला आहे. ट्विंकल शहा (वय-२१) असे तरुणीचे नाव आहे. यासोबतच सहा जणांच्या चमुतील दोन मुले आणि एका मुलगी शेलटे गावातील बंधाऱ्याच्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. यातील दोन मुलांनी आपला बचाव केला. मात्र, ट्विंकलचा यामध्ये मृत्यू झाला. ही घटना काल सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास शेलटे गावच्या हद्दीत घडली आहे.
जिल्ह्यातील वाडा-मनोर महामार्गावर वाडा तालुक्यात कोहज किल्ला आहे. या किल्ल्यावर पर्यटनासाठी मुंबई व इतर जिल्ह्यातील पर्यटक गिर्यारोहण करण्यासाठी व पर्यटनासाठी येत असतात. कालपासून वाडा तालुक्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. मुंबई भागातील ४ मुली व २ मुली या कोहज किल्यावर पर्यटनासाठी गेले होते.
किल्लावरुन परतत असताना शेलटे येथील पाण्याचा बंधारा पार करुन यावे लागते. मात्र, मुसळधार पावसाने बंधाऱ्यातील पाण्याचा प्रवाह वाढला होता. यात सायंकाळी ६.३० च्या सुमारास दोन मुले व एका मुलगी पाण्याच्या प्रवाहात उतरल्यावर ते वाहत गेले. यात दोन मुलांचा तेथील झाडांचा आधार घेऊन जीव वाचवला. मात्र, ट्विंकल उपेंद शहा (वय-२१, रा.बोरीवली मुंबई) हिचा मृत्यू झाला.
घटना घडल्यावर एका तासाने या तरुणीचा मृतदेह सापडला. त्यानंतर आज सकाळी सकाळी सहा सुमारास वाडा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर तिचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती वाडा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी प्रदीप जाधव यांनी 'ईटिव्ही भारत'शी बोलताना दिली.