पालघर - मुंबई, पुणे, मीरा-भाईंदर, वसई विरार येथील हजारो नागरिक हे अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरून चालत गुजरात, राजस्थानकडे निघाले. मात्र, लॉकडाऊनमुळे राज्याच्या सीमा बंद आहेत. त्यामुळे महाराष्ट्र गुजरातच्या सीमेवर तलासरी तालुक्यातील आच्छाडजवळ शेकडोंच्या संख्येने हे बांधव काही तासांसाठी अडकून पडले होते.
एकीकडे राज्यामध्ये जमावबंदी आणि संचारबंदीचे आदेश जारी असताना ही सर्व मंडळी एकत्रितपणे रस्त्यावर बसले होते. आम्ही रोजंदारीवर जगणारे असून लॉकडाऊनमुळे एका वेळचे जेवण मिळणे सुद्धा कठीण झाले आहे. त्यामुळे आम्हाला आमच्या गावी परत जाऊ देण्यात यावे, अशी विनंती या कामगारांनी पोलीस व प्रशासनाकडे केली.
पालघरचे पोलीस अधीक्षक गौरव सिंग व अन्य वरिष्ठ अधिकारी तोडगा काढण्यासाठी घटनास्थळी पोहोचले. नागरिकांनी आपआपल्या ठिकाणी परत जावे. त्यासाठी राज्य शासनाने वाहने पुरवण्याची तयारी दर्शवली होती. तशा प्रकारच्या सूचनाही पोलिसांनी दिल्या. मात्र, आपल्याला आपल्या मूळ गावी जाण्याचा या कामगारांचा अट्टाहास असल्यामुळे सीमा भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी कामगारांशी संवाद साधला व परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यानंतर त्यांना सुखरूपस्थळी पोहोचविण्यात आले.