पालघर- जिल्ह्यात कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा जोर आजही कायम आहे. ठिकठिकाणी सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. हे पाणी लोकांच्या घरात शिरत असून त्यांच्या मालमत्तेचे नुकसान होत आहे.
मुसळधार पावसामुळे बोईसर दांडिपाडा येथील नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरले असून त्यांच्या मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे पूर सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. वसई, नालासोपारा, विरार येथे अनेक भागात पाणी साचले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.
पावसामुळे नालासोपारा येथे रेल्वे रुळावर पाणी साचल्याने नालासोपारा-विरार लोकल सेवा ठप्प झाली होती. मात्र, आता ही सेवा सुरू झाली असून, लोकल २० ते ३० मिनिटे उशिराने धावत आहेत. पावसामुळे जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी १९५.४१ मि.मी पावसाची नोंद झाली असून वसई तालुक्यात सर्वाधिक ३४२ मि.मी पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. गरज असेल तरच घरातून बाहेर पडावे असे आवाहन प्रशासनामार्फत नागरिकांना करण्यात आले आहे.
जिल्ह्यात गेल्या २४ तासांत १९५.४१ मि.मी सरासरी पावसाची नोंद झाली असून वसई तालुक्यात सर्वाधिक ३४२ मि.मी, पालघर- २४८.८३ मि.मी, वाडा- १२५.९४ मि. मी, डहाणू- १६२.५५ मि.मी, जव्हार- ७२.८८ मि.मी. मोखाडा-५०.७५ मि.मी, तलासरी- १३६.२५ मि.मी आणि विक्रमगड- १४२.७५ मिमी, इतक्या पावसाची नोंद झाली आहे.