पालघर - शिट्टी वाजली गाडी सुटली म्हणत विनोद तावडेंनी काँग्रेस राष्ट्रवादीवर खोचक टीका केली आहे. पालघरमध्ये राजेंद्र गावित यांचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर भाजप पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करताना तावडे बोलत होते.
राजेंद्र गावितांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी इथे इतक्या मोठ्या संख्येने लोक उपस्थित आहेत. याचाच अर्थ शिट्टी वाजली गाडी सुटली असा होतो. त्यामुळे या मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादीसह बहुजन विकास आघाडीचेही काहीच चालणार नाही.
श्रीनिवास वनगा मागील लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार होते. तर राजेंद्र गावित हे भाजपचे आता दोघेही एकत्र आले आहेत. श्रीनिवास वनगाने पळून जाऊन लग्न केले, त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हे घराणे इतके आवडले, की दुसरी मुलगीही स्वतःहूनच देऊ केली, असे भाजपातून शिवसेनेत गेलेल्या श्रीनिवास वनगा व महायुतीचे उमेदवार राजेंद्र गावितांविषयी बोलताना तावडे म्हणाले.
त्यामुळे आता सासर आणि माहेर आणि त्यांना जोडणारी ही श्रमजीवी जोडी एकत्र काम करीत आहेत. त्यामुळे शिट्टी वाजली आणि गाडी सुटली म्हणजेच या ठिकाणी शिवसेना-भाजप व श्रमजीवी महायुतीचे उमेदवार राजेंद्र गावित हेच विजयी होणार, असा दावा शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी केला.