पालघर - जिल्ह्यात प्रास्तावित वाढवण बंदराला स्थानिकांचा तीव्र विरोध असून या पार्श्वभूमीवर किनारपट्टीलगत असलेले नागरिक निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याच्या पवित्र्यात आहेत. मात्र, "शिवसेना आजही आपल्या शब्दावर ठाम आहे. नाणार रिफायनरी प्रकल्प तेथील स्थानिकांच्या विरोधामुळे रद्द करण्यात आला. त्याच प्रमाणे वाढवण बंदराला स्थानिकांचा विरोध असेल, तर हे बंदरही होऊ दिले जाणार नाही," असे आश्वासन पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. त्याच प्रमाणे वाढवण बंदर विरोधी कृती समितीला दिवाळीनंतर एकनाथ शिंदे, रवींद्र फाटक यांनी माझ्या भेटीला घेऊन यावे, स्थानिकांना हवा तोच निर्णय घेऊ, असे ठाकरे यांनी सांगितले. पालघर आणि बोईसर विधानसभेचे शिवसेना महायुतीचे उमेदवार श्रीनिवास वनगा व विलास तरे यांच्या प्रचारासाठी मनोर येथे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.
हेही वाचा- चार हाडांचा बीएमसी चोर कोकणात आला होता - निलेश राणे
आदिवासींना भडकविण्याचे काम विरोधाकांकडून सुरू
धनगर समाजाला आरक्षण देताना आदिवासी समाजाचे आरक्षण कमी करण्यात येईल, असे सांगून आदिवासींना भडकविण्याचे काम विरोधाकांकडून सुरू आहे. मात्र, त्यांच्या ताटातील एक कणही हिसकावून घेण्यात येणार नाही. स्वातंत्र्य मिळून 72 वर्ष उलटून गेल्यानंतरही आदिवासी समाजाच्या परिस्थितीत बदल झाला नाही. त्याबद्दल खेद व्यक्त करीत वनपट्टे, आरोग्य सुविधा, मुलींना विनामूल्य महाविद्यालयीन शिक्षण, एक रुपयात आरोग्य चाचणी आदी सुविधा पुरवून त्यांना विकासाच्या मूळ प्रवाहात आणण्यात येईल असे उद्धव यांनी सांगितले.
राम मंदिरासाठी उठलेल्या हातांना काम देणार
राम मंदिर बांधणे हे शिवसेनेच्या अजेंड्यावर आहेच, राम मंदिराबाबतचा निकाल महिनाभरात सर्वोच्च न्यायालयात लागेल. राम मंदिरासाठी अनेक हात उठले. आता या मंदिरासाठी उठलेल्या हातांना काम देण्याचे आव्हान मी केंद्र सरकारला करत आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
अल्पभूधारक शेतकऱ्यांना 10 हजार वार्षिक देणार
300 युनिट पर्यंतच्या वीज दरात 30 टक्के कमी करणार,अल्पभूधारक शेतकऱ्यांना 10 हजार वार्षिक देणार, आरोग्य सेवा बळकट करणार, गावा जवळ सौरऊर्जा प्रकल्प उभे करुन गावांना वीज देणार, आदी वचननाम्याचा उल्लेख करीत राज्याच्या विकासासाठी आमचे हाथ बळकट करा, असे आवाहन त्यांनी केले. जिल्ह्यातील 4 विधानसभा क्षेत्रात शिवसेनेचे उमेदवार उभे असून 2 जागेवर भाजप उमेदवार उभे आहेत. त्यामुळे युतीधर्म पाळून एकमेकांना मदत करा. शिवरायांचे नाव व हातात भगवा घेणारा हा निष्ठावंत असतो. तो कधीच दगाफटका करीत नाही. असे सांगून भाजप, शिवसेनेच्या सोबतीला मतदार उभा राहिल्यास एक वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलेला महाराष्ट्र बघायला मिळेल, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. या प्रचार सभेला मंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजेंद्र गावित, सेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर, आमदार रवींद्र फाटक, श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष विवेक पंडित, पाटबंधारे विभागाचे अध्यक्ष जगदीश धोडी, कुणबी सेनेचे विश्वनाथ पाटील, जिल्हा प्रमुख वसंत चव्हाण, राजेश शहा, शिवसेना महिला संघटक ज्योती मेहेर, विकास मोरे, वैभव संखे, प्रभाकर राऊळ, कुंदन संखे, राजेश कुटे, भाजपचे प्रशांत पाटील आदी मान्यवरांसह शिवसेना कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.