पालघर - कोरोनाकाळात रुग्णांना सेवा देण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयामार्फत कोरोना उपचार केंद्रांमध्ये विविध पदावर कंत्राटी तत्वावर भरती करण्यात आली होती. मात्र यातील सुमारे 40 कर्मचाऱ्यांचे मानधन दोन महिन्यांपासून थकले आहे. त्यामुळे आता कामाचे पैसे देण्याची मागणी हे कर्मचारी करत आहेत.
40 कोरोना योद्धांचे दोन महिन्यांचे मानधन थकीत
पालघर तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय कोरोना उपचार केंद्र, साई बाबा उपचार केंद्र आणि नंडोरे आश्रमशाळेतील केंद्र यातील दाखल रुग्णांना सेवा पुरविण्यासाठी अपुरे कर्मचारी असल्याने विविध पदांची कंत्राटी भरती करण्यात आली होती. यासाठी चाळीस कर्मचारी रुजू झाले. परिचारिका, कक्ष सेवक, सफाई कामगार, स्टोर ऑफिसर, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, डेटा ऑपरेटर असलेले हे कर्मचारी दिवस रात्र या महाभयंकर महामारीच्या काळात अविरत सेवा देत आहेत. मात्र त्यांना मिळणारे मानधन गेल्या दोन महिन्यांपासून मिळालेले नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
जिल्हाधिकारी व शल्य चिकित्सकांना निवेदन
दोन महिन्यांपासून मानधन मिळालेले नसल्याने ४० कर्मचाऱ्यांनी आपल्या थकीत मानधनाबाबत जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक यांना निवेदन दिले आहे. जिल्हाधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सक यांच्यासमोर गाऱ्हाणे मांडत, थकीत मानधन देण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे.
कोरोनासाठी निधी नसल्याचे प्रशासनामार्फत सांगण्यात येत आहे. पुढे तीन आठवडे हा निधी येणार नसल्याचेही समजते. मात्र हा निधी का दिला गेला नाही हा संशोधनाचा विषय आहे. दोन महिने मानधन नसल्याने या कोरोना कर्मचाऱ्यांची चिंता आणखी वाढली आहे. मानधन नसल्याने कुटुंबाचे अर्थचक्र रुतले असल्याने लवकरात लवकर कर्मचाऱ्यांचा विचार करून मानधन अदा करावे, अशी मागणी या कर्मचाऱ्यांनी केली आहे.