वसई-विरार(पालघर)- संपूर्ण वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रात सध्या कोरोनाबाधित रुग्ण वाढत आहेत. वसई-विरारमध्ये शनिवारी एकाच दिवसात 292 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. दिवसभरात 5 रुग्णांचा कोरोनामुळे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 108 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
शनिवारी आलेल्या कोरोना चाचणीच्या अहवालानंतर वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील एकूण कोरोना रुग्णांची 9 हजार 576 वर पोहोचली आहे. वसई- विरारमध्ये 189 रुग्णांचा उपचार घेत असताना कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
पालिका क्षेत्रात आतापर्यंत 6 हजार 340 रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर सध्या 3 हजार 47 (अॅक्टिव्ह) कोरोनाबाधित रुग्णांवर रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.
दरम्यान, राज्यातील काही जिल्ह्यांत टाळेबंदी घोषित केली असली तरी कोरोनाचा संसर्ग वाढतच आहे. सलग चौथ्या दिवशी आठ हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्णांची संख्या नोंदवली गेली आहे.
शनिवारी कोरोनाचे नवीन ८ हजार ३४८ नवीन रुग्ण आढळले आहेत. सध्या राज्यात १ लाख २३ हजार ३७७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.