पालघर - जिल्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेने मांडूळ प्रजातीचा साप विक्री करण्यास आलेल्या दोन आरोपींना सापळा रचून अटक केली असून त्यांच्याकडील साप जप्त करण्यात आला आहे. या सापाची किंमत १ कोटी २० लाख रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. शशांत मोदलीयर (वय ३२) आणि मोसीन कुरेशी (वय ३०) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
नालासोपारा पश्चिम रेल्वे स्थानकालगत असलेल्या परिसरात मांडूळ प्रजातीचा साप विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पालघर स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांच्या पथकाने सापळा रचून शशांत मोदलीयर (वय ३२) आणि मोसीन कुरेशी (वय ३०) या दोघांना अटक केली असून त्यांच्याकडील मांडूळ जातीचा साप जप्त करण्यात आला आहे. हा साप दीड किलो वजनाचा आणि अडीच फूट लांब असून बाजारभावाप्रमाणे याची किंमत १ कोटी २० लाख इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या सापांचा उपयोग काळी जादू या कामासाठी आणि औषधी पदार्थ बनविण्यासाठी केला जातो.
अटक केलेल्या दोन्ही आरोपींनी हे साप चीफ वाईड लाईफ वॉर्डन यांच्या पूर्व परवानगीशिवाय बाळगल्यामुळे त्यांच्याविरोधात वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत कलम ३९ (३) सह ५१ (ब) नुसार नालासोपारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.