पालघर - पोलीस आपल्याला पकडण्यासाठी येत असल्याची खबर लागताच कोळगाव येथील दोन सराईत गुन्हेगारांनी पोलिसांवर हल्ला केला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांवर हल्ला करून हे दोन्ही गुन्हेगार फरार झाले. जयनंदन गणेश पासवान (वय 25) व राहुल गणेश पासवान (वय 26) अशी या फरार आरोपींची नावे आहेत.
दोघांवर बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. हे दोघे पालघर जवळच्या कोळगावात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी रविवारी सायंकाळच्या सुमारास कोळगावला गेले. त्यांनी तिथून शंकर सुखदेव पाटोळे या व्यक्तीला ताब्यात घेतले. मात्र, पोलीस आल्याची कुणकुण लागताचा जयनंदन आणि राहुल या दोघांनी पोलिसांवर कोयत्याने हल्ल्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वार चुकवले मात्र, त्यावेळात दोघे गुन्हेगार कोळगाव जवळील जंगलात पसार झाले.
फरार गुन्हेगारांबाबत कोणतीही मिळाल्यास पोलीस नियंत्रण कक्ष व जवळच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांमार्फत नागरिकांना करण्यात आले आहे.