पालघर Suspected Terrorists in Sadhus Attire : जयपूर-बांद्रा एक्सप्रेसमध्ये 4 संशयित दहशतवादी साधूच्या वेषात असल्याचं ट्विट दिसून आलं. त्यानंतर पोलिसांची धांदल उडाली. रेल्वे हेल्पलाइनवर ट्वीट करत साधूंचा सेल्फी फोटो घेऊन एकानं ट्विट केला होता. त्यामुळे रेल्वे पोलिसांनी लगेच हालचाल सुरू केली. रेल्वे प्रशासनामध्ये यामुळे एकच खळबळ उडाल्याचं पाहायला मिळालं.
हे चारही साधू जयपूरहून पालघर तालुक्यातील वडराई येथे असलेल्या अडगानंद महाराजांच्या आश्रमात आले होते. चौकशी आणि तपासानंतर या साधूंची सुटका करण्यात आली आहे - वसंत राय, पालघर आरपीएफचे प्रभारी
काय आहे प्रकरण? : चार दहशतवादी हे साधूच्या वेशात रेल्वेनं येत असल्याचं ट्विट एका व्यक्तीनं रेल्वे पोलिसांना केलं होतं. जयपूर-बांद्रा एक्सप्रेसनं हे दहशतवादी येत असल्याचंही त्यानं ट्विटमध्ये सांगितलं होतं. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी लगेच तपास सुरू केला. जयपूर-बांद्रा एक्सप्रेस ही पालघर रेल्वे स्थानकात येण्याआधीच रेल्वे पोलिसांनी स्टेशन आपल्या ताब्यात घेतलं होतं. तसेच सर्व खबरदारी घेण्यात आली होती. जशी ही रेल्वे पालघर स्थानकात आली तशी पोलिसांनी संपूर्ण रेल्वेची तपासणी केली. यात चारजण हे साधू वेशात असल्याचं त्यांना समजलं. मात्र, ताब्यात घेतल्यानंतर हे चारजण दहशतवादी नसल्याचं समोर आलं.
आरोपीच्या शोधात पोलीस : पालघर रेल्वे स्टेशनला यामुळे छावणीचं स्वरूप आलं होतं. पोलिसांचा प्लॅटफॉर्मवर मोठा बंदोबस्त तैनात केला होता. पालघर रेल्वे स्थानकात गाडी थांबल्यावर चार साधू वेशातील व्यक्तींना जीआरपी पोलिसांनी ताब्यात घेतलं. ट्विट करणारा प्रवासी देखील त्यांच्यासोबत प्रवास करत होता. आरपीएफ पोलिसांनी अधिक चौकशी केली असता, त्यात तथ्य नसल्याचं दिसून आलं. यावेळी 15 मिनिट ट्रेन पालघर स्थानकात थांबवण्यात आली होती. आता ट्विट करणाऱ्याचा शोध पोलीस घेत आहेत.
हेही वाचा -