पालघर - जिल्ह्यातील नाणे गावातील तुकाराम पडवले या आदिवासी समाजाच्या शेतकऱ्याने सेंद्रीय खताद्वारे आपल्या शेतात विविध पिकांची लागवड करून पीक प्रयोगशाळा बनवली आहे. आपल्या शेतामधील एक एकराच्या जागेत त्यांनी भाजीपाल्याची लागवड केली असून येथे नाविन्यपूर्ण प्रयोग म्हणून ब्रोकोलीची लागवड केली आहे.
गोमुत्राचा व इतर सेंद्रीय खतांची मात्रा वापरून शेतकरी तुकाराम पडवले यांनी आपल्या शेतात कोबी, फलॉवर, भेंडी, घेवडा, टोमॅटो, चवळी, मेथी, मुळा, वांगी, गवार आणि ब्रोकोलीची लागवड केली आहे. त्याचबरोबर, कडधान्ये पिके देखील घेतली आहेत. गोमुत्राने भाजीपाल्यावरील रोग नाहीसा होत असतो. आणि भाजीपाला हिरवागार राहत असतो. त्याच्यामुळे त्याचा वापर ते फवारणीसाठी करीत असतात. २० हजार रुपये खर्च करून दरवर्षी ३० ते ५० हजाराच्या दरम्यान फायदा होत असल्याचे शेतकरी तुकाराम पडवले यांनी सांगितले आहे. कृषी खात्याकडून दोन तलाव मिळवली आहेत. तलावातून ते मत्स्य व्यवसायही करत असतात. मत्सबीज जर चांगले असले तर चांगला फायदा होतो. या व्यवसायात ते आपला चरितार्थ चालवीत असतात.
उत्पादित शेतमालाला भाव मिळावा म्हणून ते बाजारात हा भाजीपाला विकायला घेऊन जात असतात. कधी शेडनेटमध्ये पिकविली जाणारी ब्रोकोली ही आज तुकाराम पडवले यांच्या शेतात पाहायला मिळत होती. या ब्रोकोलीची पहाणी करण्यासाठी इतर शेतकरीवर्ग त्यांच्या शिवाराला भेट देत असतात. शेतकरी पडवले यांचा हा प्रयोग परिसरातील इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायक ठरत आहे.
हेही वाचा- वाहने चोरी करणाऱ्या टोळीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या; तब्बल 64 गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न