पालघर - जिल्ह्यातून मुंबई आणि अहमदाबाद या दोन शहरांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग जातो. या महामार्गावर चारोटी आणि खानिवडे या दोन ठिकाणी टोलनाके आहेत. मात्र, केंद्र सरकारच्या घोषणेनंतर या राष्ट्रीय महामार्गावरील चारोटी, खानिवडे या दोन्ही टोलनाक्यावरील टोलवसुली बंद करण्यात आली आहे. त्यामुळे या महामार्गावर शुकशुकाट असून सध्या अत्यावश्यक सेवा देणारी वाहने फक्त सुरू आहेत.
हेही वाचा... वाशी टोल नाक्यावर टोल वसुली बंद
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. मात्र, या दरम्यान फक्त आपत्कालीन वाहतूक आणि सेवा सुरु आहे. या सेवांना कोणताही अडथळा निर्माण होऊ नये. तसेच या सुविधा अधिक गतीमान व्हाव्यात, या हेतूने राष्ट्रीय महामार्गावरील टोल आकारणी बंद करण्यात आली आहे. या संदर्भातील अधिकृत घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी केली होती.