पालघर - जिल्ह्यातील गायगोठा या भागात खैर झाडाच्या ओंडक्यांची चोरटी वाहतूक करणाऱ्या स्कॉर्पिओ गाडीवर वन विभागाने कारवाई केली. कारवाईमध्ये गाडीसह एकूण 2 लाख 75 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पालघर जिल्ह्यातील अमरभुई गायगोठा भागात मोठ्या प्रमाणात वनसंपदा आहे. या भागात आता खैर तस्करांनी डोके वर काढले आहे. वन विभागाच्या बाणगाव राऊंड परिमंडळात रात्रीच्या गस्तीदरम्यान साडेतीन वाजता एक स्कॉर्पिओ गाडी खैर झाडाची चोरटी वाहतूक करत असल्याचे वन कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी या गाडीचा पाठलाग केला असता गाडी रस्त्यात सोडून गाडीतील व्यक्ती अंधाराचा फायदा घेऊन पसार झाल्या.
गाडीत आढळली 20 ओंडकी -
वन विभागानेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेे खैराची चोरटी वाहतूक करणाऱ्या स्कॉर्पिओ गाडीची तपासणी केली असता त्यातून त्यांना खैराचे २० नग आढळले. त्यांची बाजारात 25 हजार रुपये किंमत आहे. या कारवाईत वनविभागाने गाडीसह एकूण 2 लाख 75 हजार रुपये किंमतीचा माल जप्त केला आहे. खैराची चोरटी वाहतूक होत असल्याने खैर तस्करांचा बीमोड करण्यासाठी वन विभागाने गस्त वाढवली आहे.