पालघर - शिरगाव समुद्र किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात तेलाचा तवंग पसरला आहे. लहान आकाराचे डांबरगोळे आणि तेलजन्य पदार्थांचे अवशेष समुद्रकिनाऱ्यावर पसरल्याने संपूर्ण समुद्रकिनारा विद्रूप दिसू लागला आहे. पर्यावरणप्रेमींनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे.
समुद्रात खोदकाम करणाऱ्या तेलविहिरीतून होणारी तेल गळती, तेल विहिरीत होणारे मोठे-मोठे बार, बंदरात तेल लावून ठेवलेल्या बोटी, मासेमारी बोटीतून होणारी तेल गळती, भूगर्भातून निघणारे तेल आदी कारणांमुळे समुद्राच्या पाण्यात तेल समाविष्ट होते. हा तेलाचा तवंग पावसाळी वारे आणि लाटांसोबत किनाऱ्यावर येतो. काही वेळा हा तवंग वाळूच्या संपर्कात आल्याने त्यांच्या डांबरसदृश गोळ्या तयार होतात. अशा या गोळ्यांमुळेच पालघर तालुक्यातील शिरगाव समुद्रकिनारा विद्रूप झाला आहे.
तेलतवंगाचे दुष्परिणाम -
पावसाळी मासे उत्पत्तीच्या काळातच तेलतवंग समुद्रकिनारी पसरण्याच्या घटना जास्त प्रमाणात घडत असतात. अंडी घालण्यासाठी मासे किनारी भागात येतात, तवंगामुळे निर्माण झालेल्या थरात माश्यांचा अडकून मृत्यू होतो. मासे उत्पत्तीवरही त्याचा विपरीत परिणाम होतो. खाडीजवळील माशांना चांगली मागणी असल्याने येथे पारंपरिक मासेमारी करणारे मच्छीमार मोठय़ा प्रमाणात आहेत. मात्र, अशा प्रकारच्या प्रदूषणामुळे खाडी परिसरातील माशांचा देखील मृत्यू होत असल्याने छोट्या मच्छीमारांना उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे. या तवंगामुळे मासेमारीसोबत पर्यटनावरही परिणाम होतो. किनारे विद्रूप झाल्याने पर्यटक अशा समुद्रकिनाऱ्यांवर जाणे टाळतात.