पालघर - विरारमध्ये भिक्षा मागणाऱ्या बाल भिकाऱ्यांकडे चोरीचे १४ मोबाईल सापडले आहेत. विरार पूर्वेकडील आरजे नाक्यावर असणाऱ्या बाल भिकाऱ्यांनी हे मोबाईल जमिनीत गाडून ठेवले होते. याबाबत पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर विरार पोलिसांनी मोबाईल व मुलांना ताब्यात घेतले आहे. वसई तालुक्यात बाल भिकाऱ्यांची टोळी सक्रिय असून ते मदत मागण्याच्या बहाण्याने चोरी करत असल्याचे समोर आले आहे.
सिग्नलवर नागरिक थांबले असता ही लहान मुले भीक मागण्याच्या उद्देशाने येतात. भीक मागण्याच्या बहाण्याने खिशातील, पिशवीतील, चारचाकीच्या मागच्या सीटवरील मोबाईल, रोख रक्कम आणि बॅग बेमालूमपणे पळवून नेतात. लहान मुले असल्याने आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. याचाच गैरफायदा घेत ही मुले आपला घात करतात. वसई तालुक्यात अशा अनेक घटना उघडकीस येऊ लागल्या आहेत. नालासोपारा, पाटणकर पार्क, तुळींज व चंदन नाका, विरार, आरजे नगर, वसईतील अंबाडी रोडवरील सिग्नल या ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या आहेत.
काल विरार पूर्वेच्या आरजे नाका येथील भिकारी चोरी करत असल्याचा संशय परिसरात राहणाऱ्या नागरिकांना आला. त्यांनी ही टोळी राहत असलेल्या ठिकाणाची तपासणी केली. त्यात त्यांना जमिनीत गाडून ठेवलेले १४ स्मार्टफोन सापडले. या नागरिकांनी याबाबतची माहिती विरार पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी भिकाऱयांना ताब्यात घेत मोबाईल फोन जप्त केले आहेत. महिन्यापूर्वीही असाच प्रकार नालासोपाऱ्यात उघडकीस आला होता.
वसई-विरार शहरातील रस्त्यांवर, गर्दीच्या ठिकाणी तसेच महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्यांवर हे बाल भिकारी पैशांची मदत मागण्याच्या बहाण्याने गाडीमध्ये हात घालतात. गाडीतील प्रवासाचे लक्ष नसतात हातचलाखीने वस्तू लंपास करण्यात हे पटाईत आहेत. या बाल भिकाऱ्यांच्या टोळ्या अगोदर मुंबईत सक्रिय होत्या. मात्र, आता त्यांनी आपला मोर्चा वसई-विरार परिसराकडे वळवला आहे. लॉकडाऊननंतर वसई-विरार शहरात बाल भिकाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यांचा काहीतरी बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिक करत आहेत.