वसई (पालघर) - दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ अशी म्हण आहे. असाच काहीसा प्रकार वसई रोड रेल्वे स्थानकात घडला आहे. इतर प्रवाशांसोबत झालेल्या भांडणात एका प्रवाशाची सॅक चोरट्याने पळवून नेली होती. त्यात तब्बल 1 लाख 39 हजार 836 रुपये किमतीचे दागिने व मोबाईल होता. मात्र लोहमार्ग पोलिसांनी फलाटावरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अवघ्या चोवीस तासात या चोरट्याचा शोध घेतला असून त्याला अटक करण्यात आली आहे. त्याला आठ जुलैपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली होती.
प्रवाशाच्या झटापटीत चोरट्याने उचलला फायदा -
वसई रोड रेल्वे स्थानकात 3 जुलै रोजी सकाळी सफाळे येथील आशिष पटेल या 27 वर्षीय तरुण व त्याच्या सोबत असलेल्या मित्राची ट्रेनमधून उतरताना चार ते पाच अनोळखी प्रवाशांसोबत बाचाबाची व नंतर मारहाण झाली होती. त्यावेळी झालेल्या झटापटीत त्याच्या खांद्याला अडकवलेली बॅग खाली पडली. गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांनी ती लंपास केली होती. या चोरीप्रकरणी अशिष पटेल यांने लोहमार्ग पोलिसात चोरीबद्दल तक्रार दाखल केली होती. ही घटना फलाटावरील सीसीटीव्ही कॅमेरामध्येही कैद झाली होती.
अवघ्या चोवीस तासांत आरोपीला केले जेरबंद -
लोहमार्ग पोलिसांनी याबाबत खबऱ्याकडून माहिती घेत अवघ्या चोवीस तासांत अमय गिरीश चेंबूरकर उर्फ बाब्या या नालासोपारातील अलकापुरी येथील आरोपीला अटक केली आहे. त्याच्या ताब्यातून 87 हजार 436 रुपये किंमतीचे सोन्याची चेन व लॉकेट, 34 हजार 400 रुपये किंमतीचे सोन्याची आणखीन एक चेन व 18 हजार रुपये किंमतीचा मोबाईल असा एकूण 1 लाख 39 हजार 836 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई लोहमार्ग वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन इंगवले यांच्या मार्गदर्शनात गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलिसांनी केली आहे.