पालघर - गुजरात आणि महाराष्ट्र राज्यालगत असलेल्या डहाणू किनाऱ्याजवळील दमणच्या समुद्रात तेथील तटरक्षक दलाच्या जवानाला, 17 ऑगस्टला रात्री दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास एक संशयास्पद स्पीड बोट आढळली. यामुळे पालघर जिल्ह्यातील सर्व सागरी किनार पट्टीतील लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
दमण येथील समुद्रात तटरक्षक दलाला एक संशयास्पद स्पीड बोट आढळून आली आहे. मात्र, रात्र असल्याने तिची ओळख पटली नाही. ही बोट कोणत्या दिशेने गेली, याबाबत देखील माहिती मिळालेली नाही. यामुळे डहाणू वाणगांव पोलीस ठाण्याकडून हद्दीतील सर्व समुद्र रक्षक दल, ग्रामरक्षक दल सदस्य, मच्छिमार सोसायटी पदाधिकारी, बोट मालक, चालक व ग्रामस्थ यांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला असून कोणतीही उपयुक्त माहिती मिळाल्यास तत्काळ वाणगांव पोलीस ठाण्यात संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेनंतर पालघर जिल्ह्यातील सुरक्षा यंत्रणा सतर्क करण्यात आली आहे, अशी माहिती आहे.