मुंबई - माजी पोलीस अधिकारी आणि एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा शिवसेनेच्या तिकीटावर नालासोपारामधून निवडणूक लढवत आहेत. नालासोपारामध्ये एका रॅलीदरम्यान शर्मा यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. बनावट एन्काऊंटर खटल्यातील साडेतीन वर्षांच्या शिक्षेपैकी अडीच वर्षांची शिक्षा रुग्णालयातच घालवल्याचे त्यांनी मान्य केले आहे. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू झाली आहे.
'माझ्या कठीण काळात शिंदे साहेबांनी खूप मदत केली'. त्यांच्या मदतीमुळे मला अडीच वर्षांची शिक्षा रुग्णालयात घालावी लागल्याचे शर्मा म्हणाले. याबाबतचा एक व्हिडीओ सोशल मीडीयावर व्हायरल होत आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे सध्याच्या युती सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री आहेत. त्यामुळे हा चर्चेचा विषय झाला आहे.
याबाबत शर्मा यांच्या प्रवक्त्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता व्हायरल व्हिडीओ संदर्भहीन असल्याचे ते म्हणाले. तर प्रदीप शर्मा त्यावेळी 'ऑन ड्यूटी' पोलीस अधिकारी होते, त्यामुळे एखाद्या पोलीसाला मदत करणे गुन्हा ठरत नाही, असे उत्तर एकनाथ शिंदे यांनी दिले.
कोण आहेत प्रदीप शर्मा ?
प्रदीप शर्मा महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील १९८३ बॅचचे माजी अधिकारी आहेत. १०० पेक्षा जास्त गुन्हेगारांचे एन्काऊंटर केल्यामुळे त्यांना एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळखले जात होते. मात्र, छोटा राजन टोळीच्या रामनारायन गुप्ता उर्फ लखन भैया या गुंडाचा बनावट एन्काऊंटर केल्याप्रकरणी २००६ मध्ये त्यांना अटक करण्यात आली होती. या खटल्यात त्यांना साडेतीन वर्षांची शिक्षा झाली होती. तर २००७ साली प्रदीप शर्मा यांना पोलीस सेवेतून काढून टाकण्यात आले होते.
२०१३ साली प्रदीप शर्मांना सत्र न्यायालयाने बनावट एन्कांऊटरच्या गुन्ह्यातून मुक्त केले होते. तर २०१७ साली पोलीस सेवेमध्ये पुन्हा रुजू करुन घेतले होते. तेव्हापासून शर्मा ठाणे पोलिसांत खंडणी विरोधी पथकामध्ये कार्यरत होते. २०१८ साली त्यांनी स्वेच्छेने निवृत्ती स्वीकारली होती. आता शिवसेनेच्या तिकिटावर नालासोपारा मधून ते निवडणूक लढवत आहेत.