पालघर - एकाच मंडपात दोन वधूंशी लग्न ऐकल्यावर कुणालाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. मात्र, हे खरे आहे जिल्ह्यातील तलासरी तालुक्यातील वसा, सुतारपाडा येथे राहणाऱ्या संजय धाडगा यांचा एकाच मंडपात २ वधूंशी येत्या २२ एप्रिलला विवाहसोहळा पार पडणार आहे. पेशाने रिक्षा चालक असलेल्या संजय आपल्या २ जीवन संगिनी सोबत विवाहबंधनात अडकणार आहे. २२ तारखेला हा विवाह सोहळा एकाच मंडपात पार पडणार असून, या अनोख्या विवाह सोहळ्यासाठी घरासमोरील आवरात तयारीही सुरू झाली आहे.
वर संजय धाडगा आणि वधू बेबी व रीना, अशी नावे असलेली लग्नपत्रिका सध्या समाज माध्यमांत वायरल झाली आहे. त्यानंतर एकाच मंडपात दोन वधूंशी होणाऱ्या अनोख्या लग्नाची चर्चा सर्वत्र होऊ लागली आहे. आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या संजयने रिक्षा चालवून आपला उदरनिर्वाह सुरू केला अन् १० वर्षांपूर्वी बेबी नावाच्या मुलीशी त्याचे सूत जुळले. त्यानंतर हे दोघे एकत्र घरात राहून संसार हाकू लागले, त्यातच रिक्षा चालक म्हणून कार्यरत असतानाच ८ वर्षांपूर्वी रिना नावाच्या मुलींवर त्याचे प्रेम जडले. त्यानंतर बेबी आणि रीना या दोघी संजयबरोबर एकाच घरात राजीखुशी लग्न न करताच संसार करू लागल्या. सध्या बेबीला एक मुलगा आणि मुलगी तर, रिनाला एक मुलगी आहे. ही तिनही मुले शिक्षणाचे धडे गिरवत आहेत.
संजयची कायदेशीर होणारी पहिली पत्नी म्हणजेच बेबी घरी राहून किरकोळ किराणा दुकान चालवते. तर, रीना गुजरातमधील कंपनीमध्ये काम करत आहे. संजय देखील रिक्षा चालवून आपल्या सुखी संसाराचा गाडा हाकत आहे. एकत्र नांदत असलेल्या बेबी आणि रीना घरकामही मिळूनच करतात.
आदिवासी समाजात ऐपत नसल्याने अशी अनेक कुटुंब उतारवयात सामूहिक विवाह सोहळ्यात किंवा मुलंबाळं झाल्यावरही लग्न करतात. लग्नात मांसाहारासह, मद्यपानवर खर्च करावा लागत असल्याने आदिवासी समाजात लग्नखर्च परवडणारा नसतो. त्यातल्या त्यात संपन्न कुटुंबाप्रमाणे थाटामाटात लग्न लावण्याची प्रत्येकाची इच्छा असते. मात्र, ऐपत नसल्याने अनेकजण लग्न न लावताच एकत्र राहून संसार थाटतात.
या लग्नाबाबत बेबी आणि रिना या दोघींकडून प्रतिक्रिया जाणून घेतल्या असता आम्ही दोघीही एकाच घरात सुखाने संसार करत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. ऐपत नसल्याने लग्न करता न आल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली. मात्र, आता लग्न होत असल्याने आनंद होत असल्याचे सांगितले.