पालघर - स्वतःला आणि देशाला वाचवण्याकरिता भाजप-सेना युतीला सत्तेपासून दूर करण्यासाठी महाआघाडीच्या उमेदवारांना मतदान करा, असे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी प्रचारसभेत सांगितले. डहाणूत गुरुवारी सागरनाका येथील प्रचार सभेत ते बोलत होते.
आदिवासींचे हक्क व अधिकारांसाठी लढावे लागले. वन हक्क कायदा सर्व पक्षांनी समर्थन देऊन अस्तित्वात आणला. परंतु तो सत्ताधाऱ्यांकडून लागू केला जात नाहीत. छत्तीसगड राज्यात कोळसा खाणींचे खासगीकरण करून जमिनी गिळंकृत केल्या जात आहेत. येथेही प्रकल्पाच्या नावाखाली आदिवासींच्या जमिनी बळकावण्याचा घाट घातला जात आहे. देशात दलित, आदिवासी आणि अल्पसंख्यांकांवर हल्ले होत आहेत. त्यांच्या मौलिक अधिकारांवर गदा आणली जाते. पंतप्रधानांना पत्र लिहणार्यांवर गुन्हा नोंदविण्याची तयारी केली जाते. ही सत्ताधाऱ्यांकडून केली जाणारी मुस्कटदाबीच असल्याचे येचुरी म्हणाले.
आर्थिक मंदीमुळे नागरिकांना नोकरीवर पाणी सोडावे लागत आहे. आघाडीच्या वाहन कंपनीची स्थिती दयनीय झाली असून हीच परिस्थिती प्रत्येक क्षेत्रात दिसून येते. आपला देश चहा आणि बिस्किटांचा म्हणून ओळखला जातो. परंतु 5 रुपयाचा पुडा विकत घेण्यास लोकांकडे पैसे नाहीत हे शासनाचे अपयशच म्हटले पाहिजे. लासलगावात शेतकऱ्यांकडून 2 रुपये प्रति किलोने कांदा घेतला जातो. शेतमालाला भाव नसताना बाजारात मात्र कांद्याचे भाव गगनाला भिडले आहेत. बँकांचे व्याजदर 5 टक्क्यांवरुन 3.5 टक्के केले आहेत. ग्रामीण भागात बेरोजगारी वाढल्यानेच आत्महत्या घडतात. 5 लक्ष करोड रुपयांचे कर्ज श्रीमंतांना देऊन ते माफ केले जाते. तर कर्जमाफी न मिळाल्याने शेतकरी आत्महत्या करतो हे येथील वास्तव आहे. त्यामुळे सत्ताधार्यांची ही आर्थिक नीती बदलण्याकरिता सत्ता परिवर्तन आवश्यक असल्याचेही येचुरी म्हणाले.