मुंबई : श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणी दिल्ली पोलीस वसईत तळ ठोकून थांबले आहेत. कालपर्यंत दिल्ली पोलिसांनी 17 जणांचे जबाब नोंदवले. मात्र दिल्लीत सुरू असणाऱ्या तपासात दिल्ली पोलिसांना मुंबईची जोडलेले धागेदोरे सापडले आहेत. श्रद्धा वालकरचा जबडा दिल्ली पोलिसांनी जप्त केला असून त्यावरून श्रद्धाने रूट कॅनल केले असल्याचे निदर्शनास आले आहे. हे रूट कॅनल तिने मुंबईतील डॉक्टरांकडून करून घेतल्याची माहिती आफताबकडून मिळाली त्यामुळे दिल्ली पोलीस आता मुंबईतील हा डॉक्टर कोण आहे, याचा शोध घेत आहेत. जेणेकरून त्या डॉक्टरचा जबाब नोंदवला जाऊ शकेल आणि तपासासाठी अधिक माहिती मिळू शकेल.
आफताबच्या तीन मित्रांचे नोंदवले जबाब - दिल्ली पोलिसांनी आज पालघर जिल्ह्यातील वसई गुन्हे शाखेत आरोपी आफताबच्या तीन मित्रांचे जबाब नोंदवले. दिल्ली पोलिसांनी आतापर्यंत 17 जणांचे जबाब नोंदवले आहेत.
17 जणांचे जबाब नोंदवले - श्रध्दा वालकरच्या हत्याप्रकरणा दिल्ली पोलिसांनी अद्याप 17 जणांचे जबाब नोंदवले. श्रध्दाला २०२० मध्ये झालेल्या मारहाणीसंदर्भात देखील तीन जणांचे जबाब नोंदविण्यात आले. या प्रकरणाचा तपास करून पुरावे गोळा करण्यासाठी दिल्ली पोलीस सलग पाचव्या दिवशी वसईत तळ ठोकून आहे. आफताबने २०२० मध्ये श्रध्दाला मारहाण केली होती. त्यावेळी ती नालासोपारा येथील ओझॉन रुग्णालयात उपचारासाठी दाखल होती. याप्रकरणी एका सामाजिक कार्यकर्त्या महिलेच्या मदतीने तिने पोलिसात तक्रार दिली होती. त्या अनुषंगाने पुरावे गोळा करण्यासाठी दिल्ली पोलिसांनी सोमवारी ओझॉन रुग्णालयाचे डॉ शिवप्रसाद शिंदे, तसेच समाजिक कार्यकर्त्या पूनम बिडलान यांचे जबाब नोंदवले. श्रध्दा आणि आफताब नायगाव येथील एका इमारतीत भाड्याच्या सदनिकेत राहत होते. त्याच्या मालकाचाही जबाब पोलिसांनी नोंदवला. तसेच आफताबचे आई वडील वसईतील ज्या सोसायटीत राहत होते, त्या सोसायटीच्या अध्यक्षाचा देखील जबाब नोंदवण्यात आला. तसेच आफताब आणि श्रद्धाचे मित्र मैत्रिणी गॉडवीन आणि शिवानी म्हात्रे, राहुल रॉय, मूव्हर्स अँड पॅकर्स यादवसह कॉल सेंटर मॅनेजरचा दिल्ली पोलिसांनी जबाब नोंदवून घेतले आहेत. आता नुकतेच दिल्ली पोलिसांनी आफताबाच्या ३ प्रेयसींना चौकशीसाठी बोलावल्याची माहिती मिळत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आफताब पूनावाला यानं १८ मे रोजी संध्याकाळी त्याची लिव्ह-इन पार्टनर श्रद्धा वालकर (२७) हिचा गळा दाबून खून केला आणि तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे केले. दक्षिण दिल्लीतील मेहरौली येथील त्याच्या राहत्या घरी हा सगळा प्रकार घडला. फ्रीज ठेवलेले श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे तो सुमारे तीन आठवडे वेगवेगळ्या भागात फेकत राहिला.