पालघर - जिल्हा परिषद निवडणुकीत उमेदवारी नाकारल्याने नाराज शिवसैनिकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. उपतालुका प्रमुख, विद्यमान जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंचासह शिवसैनिकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.जिल्ह्यातील वाडा पंचायत समिती गण आणि जिल्हा परिषदच्या उमेदवारीसाठी शिवसेना आणि अन्य पक्षातील पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत उमेदवारी अर्ज दाखल केले.
हेही वाचा - वसईत नाताळाचे उत्साहात स्वागत, चर्चमध्ये मिस्सासाठी ख्रिस्ती बांधवांची गर्दी
शिवसेनेचे रोहीदास शेलार यांच्या पत्नी रोहिणी रोहीदास शेलार यांना शेवटच्या क्षणी तिकीट नाकारल्याने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्या पक्ष प्रवेशावेळी शिवसेनेचे जिल्हा परिषदचे विद्यमान सदस्य भालचंद्र खोडके, शिवसेनेचे पंचायत समिती सदस्य माणिक म्हसरे, उपतालुका प्रमुख भगवान भोईर, विभाग प्रमुख सदानंद थोरात आणि पंचक्रोशीतील सेनेच्या ६ सरपंचांसह कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
हेही वाचा - नाताळ सणावर विरजण; वसईत दोन बंगल्यावर चोरांचा दरोडा
पक्ष सोडताना त्यांनी तालुक्यातील शिवसेनेच्या वरीष्ठ पदाधिकाऱ्यांवर नाराजीची तोफ डागली. यावेळी कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले. या पक्षप्रवेशावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गव्हाळे, तालुका प्रमुख रोहीदास पाटील आणि पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. राज्यात महाविकास आघाडीच्या साथीने कारभार सुरु आहे, तर पालघर जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षांतर सुरू आहे. जिल्ह्यातील वाडा पंचायत समितीच्या गण आणि गटाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या प्रमुख पक्षाच्या उमेदवारांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी मोठी गर्दी केली होती. ज्यांना पक्षाचा एबी फॉर्म मिळाला नाही त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले.