पालघर - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राजेंद्र गावित यांच्या प्रचारासाठी केलेल्या पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावेळी सभा घेतली होती. या सभेसाठी शिवसेना पक्षाने कोणतीही परवानगी न घेता व्यासपीठ उभारले आणि फलक उभारल्यामुळे आचारसंहिता भंग केल्याची फिर्याद पालघर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
दौर्यादरम्यान सफाळे, मकूणसार, केळवे, दहिसर, मनोर आदी ठिकाणी विनापरवानगीने व्यासपीठ उभारले आणि झेंडे लावले होते. २ आणि ३ एप्रिल रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पालघर जिल्ह्याचा दौरा केला होता. रात्री १० वाजल्यानंतर ते पालघर शहरात दाखल झाले होते. कार्यकर्त्यांचे अभिवादन आणि स्वागत स्वीकारण्यासाठी शिवसेना पक्षाने कोणतीही परवानगी न घेता व्यासपीठाची उभारणी केली होती.
मे. भाविक डिजिटल पालघर, मे. एस.एस अॅडव्हर्टायझिंग अँड मार्केटिंग यांनी या दौऱ्यादरम्यान व्यासपीठाची विनापरवानगी उभारणी केली होती. शहरात ११ ठिकाणी विनापरवाना फलक लावले होते. पालघर नगरपरिषद प्रशासकीय अधिकारी यांनी निवडणूक आचारसंहिचा भंग केल्याप्रकरणी याबाबत पालघरसह विविध पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.