पालघर - बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामातील पिकांवर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. अशातच खरीप हंगामात भात पिकांचे अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे उत्पादन कमी येण्याची भीती शेतकऱयांना आहे.
हेही वाचा - पालघर जिल्हा परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीची 'एकला चलो'ची भूमिका?
ढगाळ वातावरण तसेच थंड आणि उष्ण हवामानाचा प्रतिकूल परिणाम पालघर जिल्ह्यातील रब्बी हंगामात घेत असलेल्या मुग, हरभरा, वाल, तुर, वेलवर्गीय भाजीपाल्यांवर होत आहे. तसेच फळबागांवरही याचा परिणाम होत आहे.
वाडा तालुक्यात रब्बी पिकाचे एक हजार हेक्टर लागवडीचे क्षेत्र आहे. तर, एक हजार 200 हेक्टर क्षेत्रावर फळबागायत असल्याची माहिती कृषी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. हवामान बदलामुळे एखाद्या पिकाच्या फळप्रकियेपूर्वीच फुलांची गाळण होत पानांचे हरितद्रव्य शोषून पाने सुकली जातात.
हेही वाचा - वसईच्या समुद्रकिनारी आढळला मृत डाॅल्फीन
दरम्यानच्या काळात ढगाळ वातावरणामुळे अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत होत्या. त्यामुळे रब्बीत लागवड केलेल्या पिकाला याचा फटका बसला होता. दरम्यान, खरीप हंगामातील भात पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱयांनाच आता रब्बी हंगामातही नुकसानीचा फटका बसत आहे.
पालघर जिल्ह्यतील वाडा तालुक्यातील डाहे गावातील शेतकरी जगदीश कोकाटे यांनी आपल्या शेतात एक एकरात भाजीपाला लावला आहे. यात मुग, उडीद, वाल, तूर आदींची लागवड शेतात केली आहे. त्याचबरोबर मेथी, गवार, शेपू, कोथिंबीर, मुळा या भाजीपाल्यांची लागवडही परस बागेत केली आहे. बदलत्या हवामानाचा फटका रब्बी हंगामातील पिके आणि भाजीपाला यांना बसला आहे. त्यामुळे अवकाळी पावसाने खरीप हंगामात पिकांचे नुकसान केले होते. तसाच फटका रब्बी हंगामातील पिकांना बसणार असल्याची भीती शेतकऱयांना आहे.