पालघर - कोरोना महामारीमुळे शाळा सुरू करणे शक्य नसल्याने राज्य शासन ऑनलाइन शिक्षण पद्धती सुरू करत आहेत. मात्र, अशा परिस्थितीतदेखील आदिवासी दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना सोयीसुविधा उपलब्ध नसल्याने शिक्षण मिळणे कठीण झाले आहे. अनेक आदिवासी विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार आहेत. याच पार्श्वभूमीवर श्रमजीवी संघटनेमार्फत आज जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून पंचायत समिती कार्यालय पालघर येथे धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात मोठ्या संख्येने आदिवासी महिला व बांधव तसेच विद्यार्थी सहभागी झाले होते.
ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय जरी स्वागतार्ह असला तरी ज्या विद्यार्थ्यांकडे लॅपटॉप, मोबाईल, रिचार्ज करण्यासाठी पैसे आहेत, असे विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेऊ शकतात. मात्र, दुर्गम आदिवासी भागातील भागातील अनेक विद्यार्थ्यांकडे या सोयी सुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे हे विद्यार्थी शिक्षण प्रवाहाच्या बाहेर फेकले जाणार आहेत. त्यासाठी राज्य शासनाने अशा गरीब गरजू आदिवासी दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी त्वरित उपाययोजना करून सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून श्रमजीवी संघटनेने केली असून आपल्या मागण्यांचे निवेदन यावेळी गटविकास अधिकारी यांना देण्यात आले.
प्रमुख मागण्या :
१.ग्रामीण दुर्गम आदिवासी भागात इंटरनेटची सुविधा उपलब्ध करून द्यावी.
२.प्रत्येक आदिवासी विद्यार्थ्यांना लॅपटॉप किंवा स्मार्टफोन तत्काळ उपलब्ध करून द्यावा.
३. दुर्गम भागात वीज नाही, त्या ठिकाणी विजेची उपलब्धता निर्माण करून द्यावी.
४.प्रत्येक आदिवासी व गरीब विद्यार्थ्याला इंटरनेट डेटा रिचार्ज करण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा.