पालघर - जिल्ह्यातील सागावे, पाली, सत्पाळा या तीन ग्रामपंचायत निवडणूकसाठी मतदान सुरू आहे. पालघर तालुक्यातील एक आणि वसईत दोन ग्रामपंचायतींत मतदान होत आहे. आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी गावातील वयोवृद्धासह मतदाते सकाळी सात वाजल्यापासून मतदान केंद्रावर दाखल झाले आहेत. मतदान करण्यासाठी मोठ्या रांगा लागल्या आहेत. मतदान केंद्रावरही मतदात्यांचे टेम्परेचर तपासणी सॅनिटायझेशन करून विशेष काळजी घेतली जात आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
पालघर तालुक्यातील सागावे ग्रामपंचायतीमध्ये 4 जागांसाठी 8 उमेदवारांमध्ये लढत असून, वसई तालुक्यात सत्पाळा व पाली या दोन ग्रामपंचायतीच्या निवडणूकीसाठी एकूण 35 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दक्षता -
कोरोना प्रादुर्भावाचा धोका अद्याप संपलेला नाही. कोरोनाकाळात होत असलेली ही निवडणूक नियम आणि अटी पाळून मतदान सुरू आहे. मतदान केंद्रावरही मतदात्यांचे टेम्प्रेचर तपासणी सॅनिटायझेशन करून विशेष काळजी घेतली जात आहे.
मतदानासाठी सुट्टी आणि सवलत -
जिल्ह्यातील पालघर व वसई तालुक्यांतील तीन ग्रामपंचायतींसाठी मतदान होत असल्याने या भागातील सर्व आस्थापनांतील कर्मचाऱ्याना मतदान करण्यासाठी सार्वजनिक सुट्टी देण्याचे, तर अतिमहत्त्वाच्या आस्थापनातील कामगारांना दोन तास मतदान करण्यासाठी सुट्टी देण्याचे आदेश पालघरचे कामगार उपआयुक्त दहिफळकर यांनी दिले आहेत.
चोख पोलीस बंदोबस्त -
जिल्ह्यातील तीन ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत काही प्रभागांमध्ये चुरशीच्या लढती होत आहेत. काही प्रभागांत नात्यांतील माणसे एकमेकांविरूद्ध उभी ठाकली आहेत. मतदानादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी तीनही ग्रामपंचायतींच्या ठिकाणी चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.