पालघर - नालासोपाऱ्यात एका विवाहित महिलेवर घरात शिरून तीन नराधमांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून पोलिसांकडून या आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नालासोपारा पश्चिम परिसरात राहणारी पीडित महिला भाजी विक्रीचा व्यवसाय करत असून तिचा पती रिक्षा चालवतो. गुरुवारी रात्रीच्या सुमारास रिक्षा चालक पती रिक्षात सीएनजी भरण्यासाठी मीरा भाईंदर येथे गेला असताना महिला घरात एकटीच असल्याची संधी साधून तीन नराधमांनी घरात प्रवेश करून आळीपाळीने महिलेवर बलात्कार केला आणि तेथून पळ काढला.
महिलेने दिलेल्या तक्रारीवरून नालासोपारा पोलीस ठाण्यात या प्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून तिघांना अटक करण्यात आली आहे. अटक आरोपींपैकी एक आरोपी हा पोलिसांचा खबरी असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. आज त्यांना वसई न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास नालासोपारा पोलिसांकडून करण्यात येत आहे.